खोटेपणा उघड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, याचा अर्थ शासन… नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Sharad Pawar: आज मुंबईत विरोधकांच्या वतीने आज मुंबईत सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

आज मुंबईत विरोधकांच्या वतीने आज मुंबईत सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ दुरूस्त करण्यात यावा आणि नंतर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी यावेळी या मोर्चात करण्यात आली. या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, ‘देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय १९७८-८९ या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वतसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने तुम्हा आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे.
निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत विशेषत: विधानसभेच्या निवडणुकीत जो प्रकार झाला, त्यामुळे सामान्य माणसाला संसदीय लोकशाही यावरचा विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. आता या ठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूर हे आमदार यांना जे अनुभव आले. त्यांनी अनुभव सांगितला. त्याचा गैरवापर केला जात आहे. याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो. पण या सर्व गोष्टी विसरून आपल्याला एक व्हावं लागेल. आणि या देशातील मतांचा अधिकार, लोकशाहीतील हा अधिकार जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. याचा निर्धार केला पाहिजे.
काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या. इथे बनावट आधार कार्ड मिळतं. माहिती दिली. कलेक्टरला सांगितलं. सिद्ध करून द्या हे आव्हान आलं. डेमो दाखवला. हे दाखवून हा आरोप ज्याने सिद्ध केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटेपणा उघड करणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ शासन या सर्वांना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची माझी जबाबदारी आहे की काहीही करा मतदानांचा हक्क सांभाळणार.
आमचे पक्ष वेगळे आहेत. विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेद असतात. पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावे लागेल. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निकाल घेतला. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ. एवढंच सांगतो.’
