परदेशात अब्जावधीचा घोटाळा करणाऱ्या माणसाला उद्धव ठाकरे भेटले का? दिल्ली दौऱ्यावर गंभीर आरोप
"काहीच महिन्यापूर्वी ते जामिनावर बाहेर आले होते. सरकारला मुंबईत समजेल म्हणून त्यांनी दिल्लीत भेट घेतली. 7 तारखेला संजय राऊत यांनी दुपारी ही भेट घडवून आणल्याच दिसत आहे. ही भेट कशासाठी झाली? याची सखोल चौकशी होणं गरजेच आहे"

नुकताच उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा झाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यावर ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी बोचरी टीका केली आहे. त्यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. “उद्धव ठाकरे यांचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कसं नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता” अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. “निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणणारा हा दौरा होता” असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.
“गुप्ता बंधू काहीच महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आले होते. सरकारला मुंबईत समजेल म्हणून त्यांनी दिल्लीत भेट घेतली. 7 तारखेला संजय राऊत यांनी दुपारी ही भेट घडवून आणल्याच दिसत आहे. ही भेट कशासाठी झाली? याची सखोल चौकशी होणं गरजेच आहे. ज्या माणसाने एका देशाला फसवलं त्याची भेट का घेतली ?” असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. “त्यांच्या घरातील CCTV बंद केले असतील, तर रस्त्यावरचे सीसीटीव्ही किंवा त्यांचे फोन तपासा. आदेश गुप्ता, राजेश गुप्ता अशी त्यांची नाव आहेत. अशा व्यक्तींची पहिली चौकशी झाली पाहिजे” असं नरेश म्हस्के म्हणाले.
महापालिकेतून येणारे कंटेनर बंद झाले, म्हणून….
“एक राजकीय नेता दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो, त्या नेत्याच्या घरी बैठक होते. त्याचा संजय राऊत यांनी पाहिला खुलासा करावा. आधी राऊत यांनी खुलासा करावा. पुढे काय करायचं हे आम्ही ठरवू. मुंबई महापालिकेतून येणारे कंटेनर बंद झाले, म्हणून आता नवीन फंडासाठी हा दौरा होता का ?” असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारलाय. “उद्धव ठाकरे यांची बदनामी करून, त्यांना मुख्यमंत्री पदापासून बाहेर ठेवून ते ज्यांच्या पॅरोलवर आहेत, त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संजय राऊत यांना मागच्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांच्या भावाला मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी याआधी देखील उद्धव ठाकरे यांना शिव्या शाप दिल्या आहेत” असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.
