‘देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?’, राऊतांचा संताप

'देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?', राऊतांचा संताप
संजय राऊत, फादर स्टॅन स्वामी आणि नरेंद्र मोदी

देश उलथवून टाकण्याच्या कटात म्हणे हा म्हातारा सामील होता. कोणता देश? कोणाचा देश? 84 वर्षांचा एक गलितगात्र राजसत्ता उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jul 11, 2021 | 7:32 AM

मुंबई : फादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) यांच्या निधनानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमधून ( Saamana Rokhthok) केंद्रावर आसूड ओढलेत. देश उलथवून टाकण्याच्या कटात म्हणे हा म्हातारा सामील होता. कोणता देश? कोणाचा देश? सत्य तरी काय आहे? 84 वर्षांचा एक गलितगात्र देश उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. (Shivsena Sanjay Raut Slam Modi Government through Saamana Rokhthok Over father Stan Swamy Death)

फाशीवर जाणाऱ्यांनाही शेवटची इच्छा विचारली जाते पण…

“अखेर फादर स्टॅन स्वामी हा 84 वर्षांचा म्हातारा पोलीस कोठडीतच मरण पावला. फाशीवर जाणाऱ्यांनाही शेवटची इच्छा विचारली जाते. फादरला तो अधिकारही मिळाला नाही. देश उलथवून टाकण्याच्या कटात म्हणे हा म्हातारा सामील होता. कोणता देश? कोणाचा देश? सत्य तरी काय आहे?”, अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त करत केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

… इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?

“मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला. स्वामी हे राष्ट्रीय तपास एजन्सीच्या ‘कस्टडी’त बऱ्याच काळापासून होते. त्यांचे वय 84 वर्षे. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांच्या हालचाली व श्वास पूर्ण मंदावला असताना तुरुंगातच त्यांना कोरोनाने ग्रासले. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामी यांच्यावर दहशतवाद, फुटीरतावाद, राज्य उलथवून लावण्याच्या कटात सहभागी होण्याचा आरोप होता. 84 वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?”, असा सवाल राऊत यांनी विचारला.

आपली न्याय व्यवस्था स्टॅन स्वामींपेक्षा जास्त गलितगात्र, तिरडीची सोय करत बसली

“फादर स्टॅन स्वामी हे झारखंडच्या आदिवासी भागात सामाजिक कार्य करीत होते. आदिवासी मुलांची शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांनी जागरुक व्हावे, त्यांना मानवाधिकार मिळावेत यासाठी त्यांचा संघर्ष होता. त्यांचे सारे जीवन गरीब, वंचितांना समर्पित होते. ते माओवादी विचारांचे होते की नक्षलवादी हा तपासाचा भाग. पण महाराष्ट्रातील तुरुंगातही ते कैद्यांच्या मानवाधिकारविषयी लढत होते.”

“फादर स्टॅन यांना अंतिम समयी जामिनावर सोडावे अशी विनवणी अनेकांनी केली, पण हा 84 वर्षांचा आंधळा, बहिरा, गलितगात्र म्हातारा बाहेर आला तर राज्य व्यवस्थेस सुरुंग लावील असे ‘एनआयए’ वारंवार कोर्टात सांगत राहिले व आपली न्याय व्यवस्था स्टॅन स्वामींपेक्षा जास्त गलितगात्र होऊन त्या म्हाताऱ्याच्या तिरडीची व्यवस्था करत बसली, हेच सत्य आहे”, असा घणाघात राऊत यांनी केला.

देशातलं एकही न्यायालय स्टॅन स्वामींची जामिनीवर सुटका करु शकलं नाही!

“कश्मीरातील देशद्रोही, फुटीरतावादी गुपकार गँगशी पंधरा दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी चर्चा केली. या गँगला आजही कश्मीर स्वायत्त हवेच व 370 कलम तेथे पुन्हा लागू करा अशी मागणी कायम आहे. कश्मीरातील अतिरेकी दिल्लीत चर्चेला येतात व 84 वर्षांचे फादर स्टॅन स्वामी तुरुंगात तडफडून मरतात. देशाचे एकही न्यायालय स्टॅन स्वामी यांची साध्या जामिनावर सुटका करू शकले नाही. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होत आहे तशी न्याय व्यवस्थेचीही मुस्कटदाबी सुरू झाली आहे काय?”, असा सवालही राऊतांनी विचारला.

आजचे सरकार 84-85 वर्षांच्या फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव यांना घाबरलंय

आजचे सरकार 84-85 वर्षांच्या फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव यांना घाबरले आहे. स्टॅन स्वामींची तर तुरुंगात हत्याच झाली व नव्वदीतले वरवरा राव हे तुरुंगातच जीवनाशी झुंज देत आहेत. ”फादर स्टॅन स्वामींचे निधन यातनादायी आहे. पोलीस यंत्रणा आणि न्यायालयाच्या कार्यपद्धतीने मी निराश झालो आहे.” असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकुर यांनी म्हटले आहे. जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी 84 वर्षांच्या स्टॅन स्वामींना जामीन द्यावा यासाठी विनंती केली. जर्मनीच्या मानवाधिकार आयुक्तांनी, संयुक्त राष्ट्रानेही विनवणी केली. पण पाण्याचा ग्लास उचलून तोंडासही लावू न शकणाऱ्या फादर स्वामींना शेवटी तुरुंगातच मारण्यात आले.

विद्रोहाची ठिणगी टाकून मने पेटवणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो?

जंगलातील आदिवासींना त्यांच्या हक्कांची, स्वातंत्र्याची जाणीव करून देणे हे देश उलथवून टाकणे झाले काय? विद्रोहाची ठिणगी टाकून मने पेटवणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो?, असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय.

…तर त्यांच्या मनात हुकूमशाहीची बीजे रुजली आहेत!

सरकार विरोध व देश विरोध यात फरक आहे. एखाद्या सरकारला विरोध करणे म्हणजे देश उलथवण्याचा कट रचणे असे कुणाला वाटत असेल तर त्यांच्या मनात हुकूमशाहीची बीजे रुजली आहेत. ‘हुकूमशाही’वाल्या देशांच्या जागतिक यादीत हिंदुस्थानचा समावेश त्याचमुळे झाला काय?

…ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असते!

‘मुस्कटदाबी’चे प्रयोग गेल्या सहा-सात वर्षांत अनेकदा झाले. ते फसले. फादर स्टॅन स्वामींवरील अन्यायाच्या प्रकरणी अनेक विचारवंत, पत्रकार, लेखक व कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. त्याला प्रसिद्धी मिळाली. म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण इतक्या लोकांनी आवाज उठवून, विनवण्या करून सरकारला पाझर फुटला नाही व फादर स्टॅन स्वामी तुरुंगातच मेले. हीच मुस्कटदाबी आहे. जे सरकार 84 वर्षांच्या अपंग, दुबळयास घाबरते ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असते. हिटलर-मुसोलिनी तसेच होते! मग ते सरकार कोणाचेही असो!

(Shivsena Sanjay Raut Slam Modi Government through Saamana Rokhthok Over father Stan Swamy Death)

हे ही वाचा :

Stan Swamy Death: कोण होते फादर स्टॅन स्वामी?; वाचा सविस्तर

Stan Swamy Death: भीमा-कोरेगाव हिंसाप्रकरणात अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामींचं निधन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें