मंत्रिमंडळाची सुरुवात U आणि शेवट A ने, ठाकरे सरकारची उलटी बाराखडी : सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने जोरदार टीका केली आहे.

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 16:04 PM, 28 Nov 2020

नागपूर : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने जोरदार टीका केली आहे. नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला. “या सरकारच्या मंत्रिमंडळाची सुरुवात U अक्षराने आणि शेवट A ने आहे. यांची बाराखडी जशी उलटी आहे, तसेच यांचे वर्षभरातील कामंही उलटसुलट आहेत,” असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला (Sudhir Mungantiwar ciriticize Thackeray Government over GST issue and Cabinet start with U end with A).

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना अशा अनुभवी पक्षांच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या जनतेला न्याय प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. पण मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली तेव्हा लक्षात आलं की मंत्रिमडळाची सुरुवात U पासून आणि शेवट आदिती सुनिल तटकरे यांच्या A ने होतो. यांची मंत्रिमंडळाची बाराखडी जशी उलटी झालीय, तशी यांचं कामही उलटं झालंय. उलट्या बाराखडीसारखं आपण एक वर्ष याचं उलटसुलट काम करणारं सरकार अनुभवतो आहे.”

“लोकमान्य टिळकांचं वाक्य सर्वांना माहिती आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आजही सरकारचे निर्णय पाहिल्यावर हाच प्रश्न उपस्थित होतो. पण आज लोकमान्य टिळक असते तर सरकारच ठिकाणावर आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला असता. कारण एक वर्षात मुख्यमंत्र्यांची कोणतीही मुलाखत बघा, याचं भाष्य ऐका, आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला, त्याची इतिहासात नोंद झाली. पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे. जे करायचं ते केंद्र सरकार करेल हा शोध या सरकारने लावला आहे,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

“केंद्राच्या नावाने ओरडता, मग तुम्ही मंत्रिपदाच्या पाट्या लावून नवी दालनं का केली?”

सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे सरकारला रडणारं सरकार म्हटलं. ते म्हणाले, “खरंतर संविधानात केंद्र सूचीत 97 विषय आहेत, तर राज्य सूचीत 66 विषय आहे. पण प्रत्येक मंत्री आपलं अपयश केंद्राच्या माथी मारतो आहे. केंद्राने जीएसटी दिला नाही, केंद्राने मदत केली नाही, वीजबिल माफ करायला केंद्राने पैसे द्यावेत, अशी अपेक्षा करतात. यांनी फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या, नवी दालनं करायची. याचं काम काय आहे? संविधानाच्या राज्यसूचीतील 66 विषयांचे प्रश्न सोडवण्याची आणि न्याय देण्याची जबाबदारी केंद्राची आहे का? दुर्दैवाने महाराष्ट्रात लढणारं नाही, तर रडणारं सरकार आहे.”

संबंधित बातम्या :

फडणवीसांचे सरकार गेले आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले, मुनगंटीवारांचा हल्लाबोल

‘दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातील अंधार दूर झाला’, सुधीर मुनगंटीवार यांचा राज्य सरकारला टोला

मुंबईत अधिवेशन घेतल्याने कोरोना कमी होतो आणि नागपूरला वाढतो? सरकारला नोबेल द्यायला हवा; भाजपचा सरकारला चिमटा

व्हिडीओ पाहा :

Sudhir Mungantiwar ciriticize Thackeray Government over GST issue and Cabinet start with U end with A