आदित्यची उमेदवारी जाहीर होताच तेजस ठाकरे गळाभेटीला

वरळी हा माझा मतदारसंघ असला, तरी संपूर्ण महाराष्ट्र हा माझ्यासाठी मतदारसंघ असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ही घोषणा करताच त्यांचे छोटे बंधू तेजस ठाकरे (Aditya and Tejas Thackeray) यांनी येऊन गळाभेट घेतली.

आदित्यची उमेदवारी जाहीर होताच तेजस ठाकरे गळाभेटीला

मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya and Tejas Thackeray) यांनी अखेर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली. मी निवडणूक लढवणार अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी वरळीतील शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. वरळी हा माझा मतदारसंघ असला, तरी संपूर्ण महाराष्ट्र हा माझ्यासाठी मतदारसंघ असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ही घोषणा करताच त्यांचे छोटे बंधू तेजस ठाकरे (Aditya and Tejas Thackeray) यांनी येऊन गळाभेट घेतली.

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना ठाकरे कुटुंबीयांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांच्यासह व्यासपीठावरील सर्व नेत्यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. ही माझ्यासाठी ऐतिहासिक झेप आहे. ही मी सुरुवात करत आहे, त्याआधी मी 10 वर्षांपासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता निवडणूक लढवत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत घोषणेकडेच शिवसेनेचं लक्ष असल्याचंही बोललं जात आहे. युतीची घोषणा लांबल्यामुळे आदित्य यांची उमेदवारी पक्षाने अद्याप अधिकृतपणे घोषित केली नव्हती.

वरळीत मोर्चेबांधणी

आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढण्याची तयारी यापूर्वीच सुरु झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे संभावित उमेदवार सचिन अहीर यांच्या शिवसेना प्रवेशावेळीच आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला होता. कारण, या मतदारसंघातील एकमेव प्रबळ विरोधकही शिवसेनेच्या गळाला लागला होता. वरळीत सध्या शिवसेनेचाच आमदार आहे. त्यातच अगोदरपासून मोर्चेबांधणी केल्यामुळे निवडणुकीसाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI