विखेंचा भाजप प्रवेश कधी? गिरीश महाजन म्हणतात…

विखेंचा भाजप प्रवेश कधी? गिरीश महाजन म्हणतात...

नाशिक : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. या सभेत काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता, “याबाबत मला काहीही कल्पना नाही, मात्र, विखे पाटील भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे”, असं सांगितलं.

“राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत मला कल्पना नाही. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधीपक्ष नेते आहेत. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचं भाजपात येणं, काही वावगं ठरणार नाही. ते आले तर त्यांचं स्वागतच आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

तसेच, आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यामध्ये जाम्मू-काश्मीरमधील कमल 370 रद्द करु असं सांगण्यात आलं आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले, “दहशतवादी कारवायांवर आळा बसण्यासाठी कलम 370 रद्द करणं गरजेच आहे. त्यामुळेच आमच्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे.”

“राममंदीर हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राममंदीराबाबत पाच वर्षात खूप काम झालं. हा विषय न्यायालयात असला तरी अंतिम टप्प्यात आहे”, असं म्हणत गिरीश महाजनांनी जाहीनाम्यातील राममंदीराच्या मुद्याला योग्य ठरवलं. याशिवाय त्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काय छापून आलंय, हे वाचण्यासाठी सध्या वेळ नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, शिवसेना-भाजप युतीचे उत्तर महाराष्ट्रातले आठही खासदार निवडून येतील, असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला.

राधाकृष्ण विखे प्रचाराच्या मैदानात 

सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर, आपण मुलाचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका विखे पाटलांनी घेतली होती. मात्र, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुक्यांमध्ये त्यांनी काँग्रेससोबतच भाजप कार्यकर्त्यांच्याही भेटी घेतल्या. इतकंच नाही, तर काही ठिकाणी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत गुप्त बैठका केल्याचंही समोर आलं. श्रीगोंदा आणि पाथर्डी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेटी घेतल्या. तसेच, त्यांनी सुजय विखेंना नगरची उमेदवारी दिल्याने नाराज असलेले भाजप खासदार दिलीप गांधी यांचीही भेट घेतली. तब्बल एक तास बंद दाराआड चाललेल्या या चर्चेत विखेंना दिलीप गांधींची समजूत काढण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विखे मुलाचा प्रचार करत नसल्याचं सांगत छुप्या पद्धतीने सुजयला पाठिंबा देत असल्याचं दिसून येत आहे. राधाकृष्ण विखे हे जर भाजपात आले, तर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI