वास्तुनुसार घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी ठेवा ‘या’ खास गोष्टी
वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की काही खास गोष्टी घरात ठेवल्यास त्या घराचे सौंदर्य वाढवतात. त्यासोबतच घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात आणि सौभाग्य वाढवतात. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी घरात ठेवाव्यात.

सर्व हिंदू धार्मिक ग्रंथांप्रमाणे वास्तुशास्त्र खूप महत्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रात घर बांधणीपासून ते त्याच्याशी संबंधित तत्त्वे आणि नियमांपर्यंत सर्व काही सविस्तर सांगितलेले आहे. घरात वास्तुशास्त्राचे नियम पाळल्याने कुटुंबात शांती आणि आनंद मिळतो आणि घरात संपत्ती येते. तथापि वास्तुशास्त्राच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की काही खास वस्तू घरात ठेवल्यास त्या घराचे सौंदर्य वाढवतात. त्या सोबतच सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवण्यास मदत करतात आणि सौभाग्य वाढवतात. तर घरात कोणत्या खास गोष्टी ठेवाव्यात जेणेकरून घरात सकारात्म ऊर्जा टिकून राहील ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
कासवाची मूर्ती
वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घरात कासवाची मूर्ती ठेवावी. घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहतो आणि नकारात्मक उर्जेला आत जाण्यापासून रोखले जाते. कासवाची मूर्ती घराच्या वायव्य दिशेला ठेवावी. वास्तुशास्त्रात पितळ, सोने किंवा चांदीसारख्या धातूपासून बनवलेली कासवाची मूर्ती किंवा क्रिस्टल कासव ठेवणे देखील शुभ मानले जाते.
तुळशीचे रोप
हिंदू धर्मात तुळशीला देवी मानले जाते. तुळशीचे रोप खूप महत्वाचे आणि विशेष मानले जाते. जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात हे रोप असते. तुळशीमध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो. वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व आहे. अंगणात किंवा बाल्कनीत तुळस लावल्याने शुभ फळे मिळतात. घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील वाढते.
बांबू आणि मनी प्लांट
घरात बांबू आणि मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. तुमच्या घरात मनी प्लांट ठेवल्याने पैशाचा प्रवाह वाढतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहते.
हे फोटो घरात लावणे शुभ
वास्तुशास्त्रात काही विशिष्ट फोटो घरात ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पंचमुखी हनुमानजींचे फोटो, सात धावत्या घोड्यांचा फोटो आणि धबधबे, पर्वत इत्यादी नैसर्गिक दृश्यांचे फोटो घरात लावावेत. अशा फोटोमुळे घरात सौभाग्य आणि सौंदर्य वाढते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
