Champions Trophy 20205 : तू तिथं मी… आता क्रिकेटपटूंसोबत बायको पोरंही असणार दौऱ्यावर; कारण काय?
स्पर्धेदरम्यान कुटुंबीयांना खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी बोर्डाने दिली आहे. याचा अर्थ, खेळाडूची इच्छा असल्यास तो चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आपल्या कुटुंबाला सोबत नेऊ शकतात.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास आता अवघा एकच दिवस उरला असून त्याकडेच सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाचा पहिला सामना तर 20 फेब्रुवारीला होणार असून बांगलादेशविरोधात पहिली लढत होणार आहे. याचदरम्यान बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नियम बदलले आहेत. बीसीसीआयशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, बोर्डाने टूर्नामेंटदरम्यान खेळाडूंसोबत कुटुंबीयांना राहण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ, खेळाडूची इच्छा असल्यास तो चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आपल्या कुटुंबाला सोबत नेैऊ शकतात.
मात्र, यामध्ये एक अशी मेख आहे की त्यातही एक अट आहे. त्यानुसार, कोमताही खेळाडू हे फक्त एका सामन्यासाठी करू शकतो. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पराभवानंतर, बीसीसीआयने 10-पॉइंट नियम लागू केले होते, त्यापैकी एक नियम हा, कोणत्याही परदेशी दौऱ्यावर कुटुंबाला सोबत न घेण्याशी संबंधित होता.
फक्त एका सामन्यासाठी परवानगी – सूत्र
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया दुबईत आहे. आधीच्या नियमानुसार, या दौऱ्यावर कोणताही भारतीय खेळाडू आपल्या कुटुंबाला घेऊन जाऊ शकत नाही किंवा ठेवू शकत नाही, असे वृत्त समोर आले होते. मात्र, आता बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की जर एखाद्या भारतीय खेळाडूला त्याच्या कुटुंबाला दुबईला घेऊन जायचे असेल तर तो फक्त एका सामन्यासाठी असे करू शकतो.
BCCI has granted permission to watch one game for players families in Champions Trophy. [Abhishek Tripathi From Dainik Jagran] pic.twitter.com/Du6zvpYZ58
— Johns. (@CricCrazyJohns) February 18, 2025
बीसीसीआयने का बदलले नियम ?
बीसीसीआयने स्वतःचाच नियम का बदलला? असा प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहे. त्याचं कारण् म्हणजे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर खेळाडू त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही एका सामन्यासाठी सोबत नेऊ शकतात, ही अट मान्य करण्यात आली. मात्र त्यासाठी त्यांना बीसीसीआयला माहिती द्यावी लागेल. त्यांच्याकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच ते कुटुंबाला सोबत नेऊ शकतात.
आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूने मागितली परवानगी ?
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या वतीने समोर आलेल्या अहवालात आत्तापर्यंत टीम इंडियाचा एकही खेळाडू सुरुवातीला कुटुंबासोबत गेला नसल्याचे सांगण्यात आले. त्यांना एका सामन्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना तिथे आमंत्रित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने आपल्या कुटुंबाला दुबईला बोलावण्याची परवानगी मागितलेली नाही, असे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितल्यातचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.