पाकिस्तानात रचला गेला 37 धावांचा लाजिरवाणा विक्रम, 232 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला
President Trophy: पाकिस्तानमध्ये देशांतर्गत प्रेसिडेंट्स ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. 232 वर्षांचा विक्रम पाकिस्तानने मोडला आहे. काय झालं ते जाणून घ्या.

पाकिस्तान आणि लाजिरवाणे विक्रम एक समीकरण आहे. गेल्या काही दिवसात पाकिस्तानने याबाबत छाप पाडली आहे. पाकिस्तानात देशांतर्गत प्रेसिडेंट्स ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील 15व्या सामन्यात पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. दुसरीकडे, सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाइन्स लिमिटेड संघाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्यात पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने फक्त 40 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाइन्स संघाला फक्त 37 धावा करता आल्या. इतकं छोटं टार्गेत असूनही ते गाठणं काही जमलं नाही. पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाइन्स संघाचा 2 धावांनी पराभव केला. प्रथम दर्जा क्रिकेटमधील सर्वात छोटं टार्गेट राखण्यात प्रतिस्पर्धी संघाला यश मिळालं आहे. यासह 232 वर्षे जुना विक्रम मोडीत निघाला आहे. यात 1794 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यात 41 धावांचा यशस्वीरित्या बचाव केला होता. तर आता फक्त 40 धावा रोखल्याने हा विक्रम मोडीत निघाला आहे.
पीटीव्हीने या सामन्यात कमबॅक केलं
या सामन्यात पीटीव्हीने पहिल्या डावात 166 धावांची खेळी आणि दुसऱ्या डावात 111 धावा केल्या. एसएनजीपीएल संघाने पहिल्या डावात 238 धावा केल्या आणि 72 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे चौथ्या डावात एसएनजीपीएल संघाला 40 धावांचं आव्हान मिळालं. पण इतकं छोटं आव्हान असूनही पीटीव्हीच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी एसएनजीपीएल संघाला फक्त 37 धावांवर रोखलं. यासह 2 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी इंग्लंडमध्ये ओल्डफिल्डने 1794 मध्ये ओल्डफिल्डमध्ये एमसीसीविरुद्ध 41 धावांचं टार्गेट रोखत विजय मिळवला होता. हा सामना लॉर्ड्स ओल्ड मैदानात खेळला गेला होता. 232 वर्षात कोणताही संघ इतकं छोटं टार्गेट रोखू शकलं नव्हतं. पण पाकिस्तानच्या पीटीव्ही संघाने ही कामगिरी केली.
विशेष म्हणजे एसएनजीपीएल संघाचा कर्णधार शान मसूद आहे. त्याच्याकडे पाकिस्तानच्या कसोटी संघाची धुरा आहे. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदावर टीका होताना दिसत आहे. संघाला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवू शकला नाही. तर या विजयात फिरकीपटू अली उस्मानने भेदक गोलंदाजी केली. त्याने फक्त 9 धावा देत 6 गडी बाद केले. तर वेगवान गोलंदाज अमद बटने 4 विकेट घेतल्या. या दोघांनी एसएनजीपीएल संघाला 37 धावांवर तंबूत पाठवलं.
