IND A vs UAE A : जितेश शर्माचं यश झाकलं, 259 च्या स्ट्राईकने केल्या धावा पण हुकलं शतक
एसीसी आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं वादळ घोंगावलं. पण त्याच्या खेळीमुळे जितेश शर्माची आक्रमक खेळी झाकली गेली. शतकाच्या जवळ पोहोचला होता, पण षटकंच संपली.

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत ए आणि युएई ए संघ आमनेसामने आले होते. पहिल्याच सामन्यात भारताने युएई संघाला तारे दाखवले. वैभव सूर्यवंशीने कोणत्याच गोलंदाजाला दया माया दाखवली नाही. जो गोलंदाज पुढे येईल त्याला ठोकून काढला. वैभव सूर्यवंशीने 42 चेंडूत 342.86 च्या स्ट्राईक रेटने 11 चौकार आणि 15 षटकार मारत 144 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या खेळीमुळे भारताने 20 षटकात 297 धावांपर्यंत मजल मारली. पण या धावांमध्ये कर्णधार जितेश शर्माचंही योगदान होतं. पण वैभव सूर्यवंशीच्या खेळीमुळे त्याला फार भाव मिळाला नाही. जितेश शर्माने या सामन्यात 259.38 च्या स्ट्राईक रेटने 8 चौकार आणि 6 षटकार मारत 32 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. त्याचं शतक षटकं संपल्याने होऊ शकलं नाही. त्याला 17 धावा शॉर्ट पडल्या. त्याची फटकेबाजी पाहता एखाद षटक मिळालं असतं तर ते पूर्ण केलं असतं असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
जितेश शर्माने 19 व्या षटकात युएईच्या मुहम्मद इरफानला फोड फोड फोडला. त्याला कुठे चेंडू टाकावाच हेच कळत नव्हतं. त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवरही चौकार मारला. तर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारला. यासह त्याने एकूण 26 धावा ठोकल्या. पण त्याने दोन वाइड चेंडू टाकल्याने या षटकात एकूण 28 धावा आल्या. भारताच्या आक्रमणापुढे युएईचे गोलंदाज अपयशी ठरले.
भारताने विजयासाठी दिलेल्या 297 धावांचा पाठलाग करताना युएईचा संघ 149 धावांवर गारद झाला. या सामन्यात भारताने युएईला 148 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. भारताने 2 गुणांसह +7.400 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा पुढचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 16 नोव्हेंबर रोजी रविवारी होणार आहे. भारता ने हा सामना जिंकला तर पुढच्या फेरीचा मार्ग खुला होणार आहे. साखळी फेरीत भारताचा शेवटचा सामना ओमानशी होईल.
