दक्षिण अफ्रिकेला 3-0 ने लोळवल्यानंतर कर्णधार वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात पुढचा प्लान सांगितला, म्हणाला..
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंडर 19 वनडे मालिका पार पडली. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकत दक्षिण अफ्रिकेला व्हाईट वॉश दिला. या सामन्यानंतर कर्णधार वैभव सूर्यवंशीने पुढचा प्लान स्पष्ट केला आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंडर 19 वनडे मालिका पार पडली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने दक्षिण अफ्रिकेला 3-0 ने मात दिली. या मालिकेसाठी भारतीय संघाचं कर्णधार वैभव सूर्यवंशीकडे होतं. पहिल्यांदाच त्याने भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आणि पहिल्याच मालिकेत 3-0 ने व्हाईट वॉश दिला. या मालिकेसाठी सामनावीराचा आणि मालिकावीराचा पुरस्कार कर्णधार वैभव सूर्यवंशीला मिळाला. वैभव सूर्यवंशी या मालिकेत जबरदस्त कामगिरी आणि नेतृत्व गुण दाखवले. त्याचं फळ त्याला मिळालं.वैभव सूर्यवंशीकडे भारताचं भवितव्य म्हणून पाहीलं जात आहे. त्याची आक्रमक शैलीमुळे क्रीडाप्रेमी आतापासूनच त्याचा उदो उदो करत आहेत. या सामन्यातील निकालानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला की, ‘सर्वांनी चांगले काम केले. सर्व विभागांमध्ये भरपूर सकारात्मक बाबी होत्या. मैदानावर चांगले प्रयत्न आणि चांगली तीव्रता. फक्त प्रक्रियेचे अनुसरण करू आणि विश्वचषकात आमचे 100 टक्के देऊ.’
पहिल्या सामन्यात कर्णधार वैभव सूर्यवंशीची बॅट काही चालली नव्हती. त्याने 12 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या आणि बाद झाला. दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला लय सापडली. त्याने 24 चेंडूत 283.33 च्या स्ट्राईक रेटने 68 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 1 चौकार आणि 10 षटकार मारले. तिसऱ्या वनडे सामन्या वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळाला. अवघ्या 74 चेंडूत 171.62 च्या स्ट्राईक रेटने 127 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 10 षटकार मारले. गोलंदाजीतही वैभवने कमाल केली. त्याने दोन षटकं टाकली आणि 10 धावा देत 1 गडी बाद केला. वैभव सूर्यवंशीने या मालिकेत कर्णधारपदाचं दडपण नसल्याचं सिद्ध केलं आहे. इतकंच काय तर गरजेवेळी गोलंदाजीही करू शकतो हे दाखवून दिलं आहे.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशीचा फॉर्म भारतासाठी जमेची बाजू ठरणार आहे. भारताचा पहिलाच सामना अमेरिकेशी होणार आहे. त्यानंतर बांग्लादेश आणि शेवटी न्यूझीलंडशी लढत होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाकडून आणि खासकरून वैभव सूर्यवंशीकडून फार अपेक्षा आहेत. अंडर 19 वनडे संघाची धुरा आयुष म्हात्रेच्या खांद्यावर असणार आहे.
