दक्षिण अफ्रिकेत अवकाशात कडकडाट, SA20 सामना रद्द; वैभव सूर्यवंशी संघासह सुरक्षित स्थळी
दक्षिण अफ्रिकेत वातावरणात अचानक बदल झाला आणि दोन सामने रद्द करण्याची वेळ आली. एसए 20 स्पर्धेतील 11वा सामना रद्द केला गेला. तर भारत दक्षिण अफ्रिका अंडर 19 सामना मध्यात थांबवावा लागला.

क्रिकेट स्पर्धांना अनेकदा खराब हवामानाचा फटका बसतो. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होतो हे काय नवीन नाही. पण सामना पाऊस, वादळ, धुक्यामुळे रद्द झाल्याचं पाहीलं आहे. पण दक्षिण अफ्रिकेत आकाशात असं काही घडलं की सामना रद्द करण्याची वेळ आली. एक सामना रद्द करण्यात आला. तर दुसरा सामना मध्यातच थांबवावा लागला. दक्षिण अफ्रिकेत एसए20 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील 11वा सामना जोबर्ग सुपर किंग्स आणि सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात होणार होता. पण या सामन्यापूर्वी आकाशात विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. या सामन्यासाठी नाणेफेकही झाली होती. पण पंचांनी खराब हवामानाचा अंदाज घेतला आणि सामना रद्द केला.
दुसरीकडे, अंडर 19 भारत दक्षिण अफ्रिका सामन्यातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. हा सामना बेनोनीमध्ये सुरु होता. ही घटना घडली तेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता. दक्षिण अफ्रिकेने 148 धावांवर 4 गडी गमावले होते. पण विजांचा कडकडाट पाहून पंचांनी हा सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. पंचांनी कर्णधार वैभव सूर्यवंशीला सांगितलं की, अशा स्थितीत सामना खेळणं योग्य ठरणार नाही. त्यानंतर खेळाडूंना मैदान सोडून सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितलं.
𝐌𝐀𝐓𝐂𝐇 𝐀𝐁𝐀𝐍𝐃𝐎𝐍𝐄𝐃 😢 Unfortunately, inclement weather has had the final say in this one 🌧️ Ticketpro will initiate the refund process. Each team receives 2⃣ points. #BetwaySA20 #JSKvSEC #WelcomeToIncredible pic.twitter.com/fi2f7Xi7aR
— Betway SA20 (@SA20_League) January 3, 2026
यापूर्वी वीज पडल्याने एका खेळाडूचा मैदानातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 24 जानेवारी 2024ला न्यू साउथ वेल्समध्ये एक स्थानिक सामना सुरू होता. तेव्हा अचानक वीज पडली. या दुर्घटनेत 31 वर्षीय क्रिकेटपटू डेविड इवान्स याचा मृत्यू झाला. इवान्स फलंदाजीसाठी आला होता आणि तेव्हा वीज थेट त्याच्या डोक्यावर पडली. वीजेचा जोर इतका होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. इतकंच काय तर मैदानात खड्डाही पडला होता. सहा सात खेळाडू या दुर्घटनेत जखमी झाले होते. त्यामुळे असं काही घडलं की तात्काळ सामना थांबवण्याचा निर्णय घेतला जातो.
