तारीख ठरली! सचिन तेंडुलकरच्या घरी आयपीएलपूर्वी लग्नाचा बँड वाजणार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सासऱ्याच्या भूमिकेत येणार आहे. लवकरच त्याच्या दाराच्या लग्नाचा मंडप पडणार आहे. आयपीएल स्पर्धेपूर्वी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. नेमकं काय ते सर्व समजून घ्या..

क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरच्या घरी लग्नाचा बार उडणार आहे. अर्जुन तेंडुलकर लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. काही महिन्यापूर्वी सानिया चांडोकसोबत त्याचा साखरपुडा पार पडला होता. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळ पार पडला होता. रिपोर्टनुसार, आयपीएल स्पर्धेपूर्वी हे दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. मार्च 2026 मध्ये या दोघांचं लग्न होणार असून त्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, 5 मार्च 2026 रोजी अर्जुन आणि सानिया यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे समारंभ 3 मार्च रोजी सुरू होतील. एका वृत्तानुसार, लग्न समारंभ मुंबईत होणार आहे. खासगी कार्यक्रम असणार असून फक्त जवळचे मित्र, क्रिकेट जगतातील काही निवडल लोक आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
ऑगस्ट 2025 मध्ये अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा पार पडला होता. सुरुवातीचे काही दिवस या नात्याबाबत काहीच सांगण्यात आलं नाही. दोघांचा 13 ऑगस्ट रोजी साखरपुडा पार पडला आणि त्याचे फोटो समोर आले. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या नात्याबाबत अधिकृतरित्या सांगितलं. सचिन तेंडुलकरने स्वतः रेडिट एएमए (आस्क मी एनीथिंग) कार्यक्रमात हा खुलासा केला होता. एका चाहत्याने अर्जुनचा खरोखर साखरपुडा झाला आहे का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उत्तर दिलं की, हो, त्यांचे साखरपुडा झाला आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या आयुष्याच्या या नवीन टप्प्याबद्दल खूप उत्सुक आहोत.
सानिया ही एक यशस्वी उद्योजक असून मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानियाकडे पाळीव प्राण्यांची काळजी घेणाऱ्या ब्रँडची मालकही आहे. दुसरीकडे, अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. नुकत्याच मिनी लिलावापूर्वी झालेल्या ट्रेड डीलमध्ये लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सकडून अर्जुनला संघात घेतलं आहे. त्यामुळे त्याच्या क्रिकेट करिअरच्या दृष्टीने हे वर्ष आणि आयपीएल पर्व खूपच महत्त्वाचं असणार आहे. आयपीएल स्पर्धेपूर्वीच अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक लग्नबेडीत अडकतील.
दुसरीकडे, अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरसोबत सानियाची चांगली मैत्री आहे. दोघंही अनेक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. अलिकडेच, अर्जुन आणि सानिया साराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये दिसले होते. त्यात त्यांनी गाणी गायली आणि फोटो शेअर केले.
