Asia Cup 2025 : रिंकूचा गंभीर प्लानमुळे आशिया कपमधून पत्ता कट?
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र त्याआधी भारतीय संघात कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाही? यावरुन खलबतं सुरु आहेत.

आशिया कप 2025 स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यूएईमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप स्पर्धेसाठी येत्या 2-3 दिवसात भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. मात्र त्याआधी या स्पर्धेसाठी कुणाला संधी मिळणार आणि कुणाला नाही? याची चर्चा पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धेआधी काही ठराविक खेळाडूंच्या नावांची चर्चा कायम होतेच. मात्र 15 खेळाडूंमध्ये कुणाकुणाला संधी द्यायची? हे आव्हानही निवड समितीसमोर असतं. त्यामुळे अनेकदा नाईलाजाने काही खेळाडूंना वगळावं लागलं. आशिया कप स्पर्धेत फिनीशर रिंकू सिंह याला संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
यशस्वी आणि गिलसह रिंकूही अडचणीत!
आशिया कप स्पर्धेचं 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे. त्याआधी 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान केव्हाही भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. त्याआधी शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्याबाबतही चर्चा सुरु आहे. शुबमन आणि यशस्वी ही जोडी गेल्या अनेक महिन्यांपासून टी 20i क्रिकेटपासून दूर आहे. शुबमन आणि यशस्वी वनडे आणि कसोटीत सातत्याने खेळत आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या त्रिकुटाने इथे टी 20i मध्ये आपली जागा फिक्स केली आहे. त्यामुळे शुबमन आणि यशस्वीला संधी द्यायची की नाही? हा निवड समितीसमोर सर्वात मोठा पेच असल्याचं म्हटलं जात आहे. हेच समीकरण रिंकू सिंह याच्याबाबत आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार, रिंकूची निवड होण निश्चित नाही.
टी 20i वर्ल्ड कप 2024 नंतर मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी या चौघांनी आपलं स्थान कायम केलं आहे. नितीशला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली. त्यामुळे नितीशच्या जागी ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर याने दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे रिंकूसाठी स्पर्धा आणखी वाढलीय इतकं मात्र निश्चित.
गंभीरच्या प्लानमुळे रिंकूला डोकेदुखी!
गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून खास रणनिती अवलंबत आहे. गंभीर हेड कोच झाल्यापासून अशाच खेळाडूंना निवडत आहेत जे एकापेक्षा अधिक भूमिका बजावत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास गंभीरने आतापर्यंत प्राधान्याने ऑलराउंडर खेळाडूंना संधी दिली आहे. रिंकू सिंह फक्त बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर हे तिघे ऑलराउंडर आहेत. तसेच बॅकअप विकेटकीपर म्हणून जितेश शर्मा याला संधी मिळाल्यास तो फिनीशर म्हणून भूमिका बजावू शकतो. त्यामुळे रिंकूला सद्य परिस्थिती आणि समीकरणं पाहता संधी मिळणं अवघड असल्याचं चित्र आहे. मात्र निवड समिती काय निर्णय घेते? यावर सर्व अवलंबून असणार आहे.
