IND vs PAK : भारताने शेवटच्या 12 चेंडूत असा फिरवला सामना, दुबे आऊट झाला आणि शेवटच्या षटकात असं घडलं
आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. हा सामना एक क्षण भारताच्या हातून निसटला होता. पण तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबेने यांनी सामना खेचून आणला. शेवटच्या 12 चेंडूत तर धाकधूक वाढली होती.

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करण्याची हॅटट्रीक साजरी केली आणि जेतेपदावर नाव कोरलं. पण अंतिम सामन्यातील विजय वाटतो तितका सोपा नव्हता. कारण हा सामना पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानच्या हातात गेला होता. कारण भारताने पॉवर प्लेच्या 4 षटकातच महत्त्वाचा 3 विकेट गमावल्या होत्या. अभिषेक शर्माची विकेट गेल्यानंतर भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. त्यानंतर फॉर्मात नसलेले शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. त्यानंतर हा सामना हातून जाणार असंच वाटत होतं. पण मधल्या फळीत तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. संजू सॅमसन 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकार मारत 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माला शिवम दुबेने साथ दिली. शेवटच्या 12 चेंडूत तर धाकधूक वाढली होती.
भारताला 12 चेंडू 17 धावांची गरज होती. फहीम अश्रफ गोलंदाजी करण्यासाठी आला होता. खरं तर दोन्ही संघांसाठी हे षटक खूपच महत्त्वाचं होतं. हे षटक टाकण्यापूर्वी फहीमने क्रॅम्प आल्याचं नाटक सुरु केलं आणि पाच मिनिटांचा वेळ वाया घालवला. या माध्यमातून त्याला भारतीय खेळाडूंची लय तोडायची होती असंच दिसत होतं. त्याच्या पहिल्या तीन चेंडूंवर 3 धावा आली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर शिवम दुबेने चौकार मारला. पाचवा चेंडू निर्धाव गेला आणि सहाव्या चेंडूवर शिवम दुबेची विकेट पडली.
भारताची पाचवी विकेट पडल्यानंतर रिंकु सिंह मैदानात आला. पण स्ट्राईकला तिलक वर्मा होता. तर गोलंदाजी करण्यासाठी समोर हारिस रऊफ होता. भारताला 6 चेंडूत 10 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने 2 धावा काढल्या. त्यामुळे 5 चेंडू आणि 8 धावा अशी स्थिती आहे. मग काय तिलक वर्माने दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारत टेन्शन रिलीज केलं. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि सामना बरोबरीत आणला. चौथ्या चेंडूचा सामना करण्यासाठी रिंकु सिंह समोर होता. 3 चेंडूत 1 धाव होती. रिंकु सिंहने त्याच्या खेळाला साजेशी म्हणजेच फिनिशर स्टाईलमध्ये चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला.
