Rohit Sharma Century : रोहितचं शेवटच्या सामन्यात वादळी शतक, ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुपर ‘हिट’शो, गोलंदाजांना चोपला
IND vs AUS 3rd Odi Rohit Sharma Century: हिटमॅन रोहितने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे. रोहितच्या कारकीर्दीतील हे 33 वं तर ऑस्ट्रेलिया विरुद्धचं नववं शतक ठरलंय.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. रोहित पर्थमध्ये 8 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर रोहितने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं. रोहितने एडलेडमध्ये 73 धावांची खेळी केली. त्यानंतर रोहितने या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कमाल केली आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 237 धावांचा पाठलाग करताना खणखणीत शतक झळकावलं आहे. रोहितच्या कारकीर्दीतील हे 33 वं शतक ठरलं आहे. रोहितने या शतकासह टीम इंडियाला विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं आहे. रोहितने अवघ्या 63 चेंडूत एकदिवसीय कारकीर्दीतील 60 वं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर रोहितने गिअर बदलला. रोहितने फटकेबाजी करत 105 चेंडूत शतक पूर्ण केलं. रोहितने शतक पूर्ण करताच साऱ्या मैदानात क्रिकेट चाहत्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.
रोहितच्या आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक
रोहितने शतकासाठी 105 चेंडूंचा सामना केला. रोहितने या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितने 95.24 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रोहितचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं एकदिवसीय कारकीर्दीतील नववं शतक ठरलं. विशेष म्हणजे रोहितने यासह शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं. रोहितचं एकदिवसीय, कसोटी आणि टी 20I या तिन्ही फॉर्मेटमधील मिळून हे 50 वं शतक ठरलं.
सचिनच्या विक्रमाची बरोबरी
रोहितने या शतकासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या महारेकॉर्डची बरोबरी केली. रोहितने सचिनच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 9 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली. तसेच रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतकं करणारा पहिला विदेशी फलंदाजही ठरला आहे.
कुमार संगकाराला पछाडलं
रोहितचं हे ऑस्ट्रेलियातील सहावं शतक ठरलं. रोहितने यासह श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्या 5 शतकांचा विक्रम मोडीत काढला.
रोहितचं फेब्रुवारीनंतर पहिलं शतक
तसेच रोहितने जवळपास 259 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. रोहितने याआधी फेब्रुवारी महिन्यात कटकमध्ये इंग्लंड विरुद्ध शतक केलं होतं. तसेच रोहितने शतक खेळीत 2 षटकार लगावले. रोहितने यासह एकदिवसीय कारकीर्दीत 349 षटकार पूर्ण केले.
रोहित-विराट आता केव्हा खेळणार?
दरम्यान आता रोहित आणि विराट कोहली हे दोघे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिका नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरमध्ये उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. आता चाहत्यांना या मालिकेची प्रतिक्षा असणार आहे.
