IND vs AUS : रोहितची पर्थमधील कामगिरी कशी? आकडेवारी पाहून म्हणाल ऑस्ट्रेलियाची धुलाई होणारच!
Rohit Sharma Odi Record Perth : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमधून कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. रोहितची या मैदानातील कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घ्या.

शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यातून कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वनडे कॅप्टन म्हणून डेब्यू करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं पुनरागमन होणार आहे. या जोडीने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघासाठी एकदिवसीय सामना खेळणार आहेत. त्यामुळे या जोडीच्या कमबॅकची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. या मालिकेला रविवारी 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात वनडे सीरिजमधील पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. या मैदानातील रोहितची आकडेवारी कमालीची आहे. रोहितने या मैदानात खोऱ्याने धावा केल्या आहेत. या निमित्ताने रोहितने पर्थमध्ये किती धावा केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
रोहितची पर्थमधील आकडेवारी
रोहितने पर्थमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित या मैदानात टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहितने 4 सामन्यांमध्ये 245 धावा केल्या आहेत. रोहितचा या मैदानातील एव्हरेज हा 122.5 असा आहे. रोहितने या मैदानात 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे. तसेच रोहितने या मैदानात 25 चौकार आणि 8 षटकार लगावले आहेत.
रोहितने वनडे क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 3 वेळा द्विशतक केलंय. रोहितला काही वर्षांपूर्वी पर्थमध्येही द्विशतक करण्याची संधी होती. मात्र रोहितची ती संधी थोडक्यात हुकली. रोहितने 2016 साली पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 सिक्स आणि 13 फोरसह नॉट आऊट 171 रन्स केल्या होत्या. रोहितची पर्थमधील171 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे रोहितने आता 19 ऑक्टोबरला 9 वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी, अशा आशा चाहत्यांना आहे.
रोहित शर्माची एकदिवसीय कारकीर्द
दरम्यान रोहित शर्मा याने आतापर्यंत टीम इंडियाचं 273 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रोहितने या 273 सामन्यांमधील 265 डावात बॅटिंग केली आहे. रोहितने 48.77 च्या सरासरीने आणि 92.81 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 168 धावा केल्या आहेत. रोहितने कारकीर्दीत आतापर्यंत 344 षटकार आणि 1 हजार 44 चौकार लगावले आहेत. तसेच रोहितने 32 शतकं आणि 58 अर्धशतकं लगावली आहेत. सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहितच्या नावावर सर्वाधिक 3 एकदिवसीय द्विशतकांच्या विश्वविक्रमाची नोंद आहे.
