Cricket : आयपीएल फायनलनंतर टीम जाहीर, निवृत्ती घेतलेल्या खेळाडूची एन्ट्री
T20i Series : मंगळवारी 3 जून रोजी अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3 जून रोजी पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफी जिंकली. आरसीबीने या विजयासह 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली. लीग क्रिकेटनंतर आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारत इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा थरार 11 जूनपासून रंगणार आहे. अशात आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. निवड समितीने या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे. त्यानुसार मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 19 ते 27 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. तर त्याआधी उभयसंघात एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.
ग्लेन मॅक्सवेल याला संधी
विंडीज विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याला संधी देण्यात आली आहे. मॅक्सवेलने अवघ्या काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र मॅक्सवेलने टी 20i क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
मिशेल ओवेनला पहिल्यांदाच संधी
विंडीज विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीममध्ये मिशेल ओवेन याला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. मिशेल ओवेन याला बिग बॅश लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच जोरावर ऑस्ट्रेलिया संघात संधी देण्यात आली आहे. ओवेन आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळत होता. तसेच कसोटी संघातील खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
विंडीज विरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
SQUAD ✈️🌴
Mitchell Marsh will lead a squad of 16 for the T20I component of our national men’s team’s upcoming tour of the West Indies. pic.twitter.com/liw6KlvtUU
— Cricket Australia (@CricketAus) June 4, 2025
टी 20i मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिशेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, कूपर कोनोली, टीम डेव्हीड, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मॅथ्यू कुहनेमॅन, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट आणि एडम झॅम्पा.
