एका चेंडुवर अक्षर पटेलने दिल्या 20 धावा! हार्दिकच्या जखमेवर सॉल्टने चोळलं ‘मीठ’
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना कटक मैदानात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने या सामन्यात सावध पण चांगली सुरुवात केली. पण अक्षर पटेलच्या एका चुकीमुळे टीम इंडियाला 20 धावांचा फटका बसला.

दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने कमबॅकसाठी कंबर कसलेली आहे. दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा मानस आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार जोस बटलर याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण आघाडीच्या जोडीने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी फिलीप सॉल्ट आणि बेन डकेट्स यांनी 81 धावांची भागीदारी केली. खरं तर ही भागीदारी 43 धावांवरच संपुष्टात आली असती. तसेच इंग्लंडवर दबाव वाढला असता. पण अक्षर पटेलची एक चूक टीम इंडियाला नडली. इतकंच काय 20 धावांचा अतिरिक्त फटका बसला. कर्णधार रोहित शर्माने संघाचं सहावं षटक हार्दिक पांड्याकडे सोपवलं होतं. पाच चेंडूवर 8 धावा आल्या आणि सहाव्या चेंडूवर स्ट्राईक असलेल्या फिलीप सॉल्टने डीप बॅकवर्डला उंच फटका मारला. तिथे अक्षर पटेल फिल्डिंगला उभा होता. एकदम सोपा झेल होता. पण अक्षरला हा सोपा झेल काही पकडता आला नाही आणि फिलीप सॉल्टला जीवदान मिळालं.
फिलीप सॉल्टचा झेल सोडला तेव्हा तो 6 धावांवर होता. तसेच डकेटबरोबर 44 धावांची भागीदारी झाली होती. पण त्यानंतर सॉल्टने यात 20 धावा जोडल्या आणि 38 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाचं जवळपास 20 धावांचं नुकसान झेल सोडल्याने झालं. फिलिप सॉल्ट बाद झाला तेव्हा त्याने 29 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावाचं महत्व आहे. एका धावेने सामना गमवण्याची वेळ येते. त्यामुळे झेल पकडणं खूपच महत्त्वाचं असतं. अक्षर पटेलने झेल पकडला असता तर कदाचित 20 धावा कमी झाल्या असत्या.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) February 9, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
