…आणि ख्रिस गेलला रडू कोसळलं! प्रीति झिंटाच्या संघावर केला खळबजनक आरोप
ख्रिस गेलने आयपीएल स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली आहे. समोर फलंदाजीला असला की भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. मात्र आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्यावर रडण्याची वेळ आली होती. पंजाब किंग्सवर आरोप करत त्याने हा खुलासा केला आहे.

आयपीएल स्पर्धेतील सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून ख्रिस गेलचं नाव घेतलं जातं. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक गोलंदाजांचं करिअर संपवलं आहे. आता ख्रिस गेलने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना मिळालेली वागणूक पाहता ख्रिस गेल नाराज झाला होता. इतकंच काय तर आयपीएल स्पर्धेला रामराम ठोकण्याची वेळ आली. एक वेळ अशी आली की ख्रिस गेलला डिप्रेशनमध्ये जातो की काय अशी भीती सतावत होती. ख्रिस गेलने एका मुलाखतीत खळबळजनक आरोप करताना सांगितलं की, पंजाब किंग्सने त्याचा अपमान केला. त्यावेळेस संघाचा प्रशिक्षक असलेल्या अनिल कुंबळेसोबत फोनवरून चर्चा केली होती. तसेच मानसिक तणावात असल्याचं सांगितलं होतं. गेलने सांगितलं की, कुंबळेसोबत बोलत असताना रडू कोसळलं होतं.
ख्रिस गेलने सांगितलं की हे प्रकरण 2018 या वर्षातील आहे. पंजाब किंग्सने ख्रिस गेलने 2 कोटींच्या बेस प्राइसवर विकत घेतलं होतं. 2021 पर्यंत गेल पंजाब किंग्ससोबत खेळला. पण बायो बबलमुळे त्याला आयपीएल 2021 अर्धवट सोडावी लागली. पण गेलने तेव्हा नेमकं काय झालं होतं ते दु:ख आता कुठे सांगितलं. त्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं त्याने सांगितलं. ‘पंजाबसोबत माझं आयपीएल पर्व पहिलाच संपलं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर, पंजाब किंग्सने मला अपमानास्पद वागणूक दिली. मला वाटते की एक वरिष्ठ खेळाडू म्हणून मला योग्य वागणूक मिळाली नाही. त्यांनी माझ्याशी लहान मुलासारखे वागले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असे वाटले की मी नैराश्याकडे जात आहे.’
‘तुमची मानसिक स्थिती पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. मी अनिल कुंबळेला फोन केला आणि त्यांना सांगितले की मी संघ सोडत आहे. पुढे विश्वचषक होता आणि आम्ही बायो बबलमध्ये होतो. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. मुंबईविरुद्धचा शेवटचा सामना खेळल्यानंतर, मला वाटले की मी संघात राहून स्वतःचे अधिक नुकसान करू शकत नाही. अनिल कुंबळेशी बोलताना मी रडलो. अनिल कुंबळे आणि संघ ज्या पद्धतीने चालला आहे त्यावरून मी खूप निराश झालो. कर्णधार केएल राहुलने मला फोन केला आणि सांगितले की तुम्ही पुढचा सामना खेळाल पण मी शुभेच्छा दिल्या, मी माझी बॅग पॅक केली आणि तिथून निघून गेलो.’, असं ख्रिस गेलने सांगितलं.
