Aaryavir Sehwag: सेहवागच्या मुलाची मॅच विनिंग खेळी, 99 धावा ठरल्या खास
Cooch Behar Trophy: कूच बेहार ट्रॉफी दिल्लीने बिहारला पराभवाची धूळ चारली. हा सामना दिल्लीने 8 गडी राखून जिंकला. या विजयात वीरेंद्र सेहवागच्या मुलाची खेळी महत्त्वपूर्ण ठरली.

Aaryavir Sehwag Batting: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घरातूनच फलंदाजीचे धडे गिरवल्याने त्याची छाप आता मैदानात दिसत आहे. आर्यवीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीची छाप सोडण्यास सुरुवात केली आहे.आर्यवीर सेहवाग 2023 पासून त्याच्या वयोगटातील क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. क्रिकहिरोजच्या मते, त्याने एकूण 61 सामने खेळले असून 2103 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी कूचबिहार ट्रॉफीत द्विशतक झळकावून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता कूचबिहार ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना आर्यवीर सेहवागने बिहारच्या गोलंदाजांचा जबरदस्त सामना केला. या सामन्यात आर्यवीर सेहवागने एकूण 99 धावांची खेळी केली. तसेच्या त्याच्या विजयी खेळीने दिल्लीने बिहारवर 8 गडी राखून विजय मिळवला. आर्यवीर सेहवाग व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज लक्ष्मणही या सामन्यात चमकला. त्याने एकूण 11 विकेट काढल्या. पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 4 गडी बाद केले.
पालम येथील एअर फोर्स कॉम्प्लेक्सच्या ग्राउंडवर दिल्लीची सुरुवात एकदम निराशाजनक झाली. आराध्या चावला फक्त 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर तन्मय चौधरीही काही खास करू शकला नाही. आला तसाच परत गेला. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर संघाची बाजू सावरण्यासाठी आर्यवीर सेहवागने कर्णधार प्रणव पंतसोबत शतकी भागीदारी केली. तिसऱ्या विकेटसाठी दोघांनी 147 धावांची भागीदारी केली. दोघांनी अर्धशतक झळकावले, पण शतकाचं स्वप्न काही पूर्ण करू शकले नाही. आर्यवीर 72, प्रणव पंत 89 धावांवर बाद झाले. दिल्लीने पहिल्या डावात 287 धावा केल्या.
दिल्लीने पहिल्या डावात केलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना बिहारचा संघ गडबडला. पहिल्या डावात फक्त 125 धावा करून शकले. त्यामुळे बिहारला फॉलोऑनचा सामना करावा लागला. दुसऱ्या डावात बिहारने 205 धावा केल्या आणि दिल्लीसमोर विजयासाठी फक्त 53 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे आव्हान दिल्लीने 2 गडी गमवून 15.2 षटकात पूर्ण केलं. आर्यवीरने दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा करत दिल्लीला विजय मिळवून दिला. आर्यवीरने दोन्ही डावात मिळून 99 धावांचं योगदान दिलं. त्याचं हे योगदान संघासाठी खूपच मोलाचं होतं.
