IND vs SA : शुबमन गिलनंतर या दोन खेळाडूंना रुग्णालयात जाण्याची वेळ, दुसऱ्या कसोटीआधी टेन्शन
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं आहे. कारण आणखी दोन खेळाडूंना रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. नेमकं काय झालं आणि कशासाठी ते जाणून घेऊयात...

India vs South Africa 2nd Test: भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात करो या मरोची स्थिती आहे. अशा स्थितीत भारताचा कर्णधार शुबमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. कारण पहिल्या कसोटी सामन्यात रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतावं लागलं होतं. त्यानंतर थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. आात गुवाहाटी कसोटी सामन्यापूर्वी आणखी दोन खेळाडूंना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, कोलकात्याच्या खासगी रुग्णालयात साइम हार्मर आणि मार्को यानसेन यांना दाखल करावं लागलं. पहिल्या कसोटी सामन्यात या दोन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. मात्र आता त्यांना रुग्णालयात जावं लागलं.
यानसेन आणि हार्मरला नेमकं काय झालं?
दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यानसेन आणि सायमन हार्मर यांना कोलकात्याच्या खासगी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल व्हावं लागलं. रेव्हस्पोर्ट्स ग्लोबलच्या रिपोर्टनुसार, या दोघांना नेमकं काय झालं आहे ते मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सामन्यात किंवा सरावादरम्यात दुखापत झाल्याचं वगैरे काही समोर आलेलं नाही. मग काय कारण असावं? क्रीडाप्रेमींच्या मते फूड पॉयजनिंग झाली असावी. दुसरीकडे, खरंच दुखापत झाली असेल तर दक्षिण अफ्रिकेला हा मोठा धक्का असेल. कारण या दोन्ही खेळाडूंनी कोलकाता कसोटीत चांगली कामगिरी केली होती.
सायमन हार्मर कोलकाता कसोटी विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याने दोन्ही डावात प्रत्येकी 4 विकेट घेतल्या होत्या. एकूण 8 विकेट घेत सामनावीराचा मानकरी ठरला होता. तर मार्को यानसेनने या सामन्यात एकूण 5 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांना बाद करत सामन्याचं चित्रच पालटलं होतं. पण आता हे दोन्ही खेळाडू फिट अँड फाईन आहेत का? दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार शुबमन गिल गुवाहाटी कसोटीत खेळणं कठीण आहे. मानेच्या दुखापतीतून अजून सावरलेला नाही. त्याला विमानातून प्रवास करणं टाळण्यास सांगितलं आहे.
