IPL 2024 : प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्लीला मोठा झटका, कॅप्टन ऋषभ पंतवर बीसीसीआयकडून मोठी कारवाई
Rishabh Pant Suspended Ipl 2024 : बीसीसीआयने दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर प्लेऑफसाठी रस्सीखेच असताना मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे दिल्ली टीमच्या अडचणी वाढल्या आहेत.

आयपीएलच्या 17 व्या मोसमात 59 सामन्यानंतरही प्लेऑफचं एकाही टीमला तिकीट मिळवता आलेलं नाही. स्पर्धेतून पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स बाहेर पडल्याने आता 8 संघांमध्ये प्लेऑफच्या 4 जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्सने शुक्रवारी 10 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत स्वत:सह लखनऊ, आरसीबी आणि दिल्लीचंही आव्हान कायम राखलं. प्लेऑफसाठी रस्सीखेच सुरु असताना बीसीसीआयने दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंतवर सर्वात मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने पंतवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच पंतला एका सामन्यात खेळताही येणार नाही. त्यामुळे ऐन क्षणी पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीला खेळावं लागणार आहे.
नक्की कारण काय?
पंतकडून आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पंतला आरसीबी विरुद्ध 12 मे रोजी होणाऱ्या सामन्यात खेळता येणार नाही.आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात 7 मे रोजी दिल्लीने राजस्थानवर विजय मिळवला. दिल्लीला या सामन्यात ओव्हर रेट कायम राखता आला नाही. पंत ठराविक वेळेत ओव्हर पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे बीसीसीआयने ही कारवाई केली आहे.
बंदीची कारवाई का?
कॅप्टन म्हणून ऋषभ पंतवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई होण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्या 2 वेळेस फक्त दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र तिसऱ्या वेळेस थेट एका सामन्यासाठी प्रतिबंधित करण्यात येतं. त्यानुसारच पंतवर ही कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर पंतला दंड म्हणून 30 लाख रुपयेही द्यावे लागणार आहेत. तसेच राजस्थान विरुद्धच्या सामन्यातील इमपॅक्ट प्लेअरसह प्लेईंग ईलेव्हनचा हिस्सा असलेल्या खेळाडूंना त्या सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे. त्यामुळे दिल्लीसाठी हा तगडा झटका आहे.
बीसीसीआयची पंतसह दिल्ली टीमवर मोठी कारवाई
RISHABH PANT HAS BEEN SUSPENDED FOR THE MATCH vs RCB DUE TO OVER-RATE PENALTY….!!!! pic.twitter.com/53BeYJStFE
— Johns. (@CricCrazyJohns) May 11, 2024
दिल्ली कॅपिट्ल्सने मॅच रेफरीच्या निर्णयाविरोधात आयपीएल आचार संहितेच्या अनुच्छेद 8 नुसार, या निर्णयाला आव्हानाला दिलं होतं. त्यानंतर हे प्रकरण बीसीसीआयच्या संबंधित समितीकडे पाठवण्यात आलं. या प्रकरणी सुनावणी झाली. बीसीसीआयने दिल्लीला झटका देत मॅच रेफरीचा निर्णय बरोबर ठरवला.
दिल्लीची कामगिरी आणि आगामी सामने
दरम्यान दिल्लीने या हंगामात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. दिल्लीने 12 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली 12 पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी विराजमान आहे. दिल्लीचे उर्वरित 2 सामने हे 12 आणि 14 मे रोजी आरसीबी आणि लखनऊ विरुद्ध होणार आहेत. दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकणं बंधनकारक असणार आहेत.