BAN vs IRE क्रिकेट सामना सुरु असताना भूकंपाचे तीव्र धक्के, काय झालं? पाहा Video
बांग्लादेश आणि आयर्लंड यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यासाठी आयर्लंडचा संघ बांग्लादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात कसोटी मालिका खेळली जात आहे. पण हा सामना सुरु असताना भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यानंतर काय झालं ते जाणून घ्या.

क्रिकेटच्या मैदानात विचित्र प्रकार घडताना तुम्ही टीव्ही किंवा प्रत्यक्षात पाहीलं असेल. कधी मैदानात साप घुसला, तर कधी फ्लड लाईट बंद झाल्या, तर कधी पावसामुळे सामना थांबवण्याची वेळ आली आहे. अशी वेगवेगळी कारणं आजपर्यंत तुम्ही पाहीली ऐकली असतील. पण भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे सामना थांबवावा लागला हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. मीरपूरच्या शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये बांग्लादेश आणि आयर्लंड यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. हा सामना सुरू असताना भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. शुक्रवारी सकाळी बांगलादेशमध्ये 5.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचा परिणाम सामन्यावर झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या डावात 55 षटकं खेळत आयर्लंडने 165 धावांवर पाच विकेट गमावले होते. त्याचवेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
अमेरिकन एजेंसी युएसजीएसच्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदु बांगलादेशच्या नरसिंगडीजवळ होता. तसेच 10 वाजून 8 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले गेले. यानंतर सामना काही वेळ थांबवला गेला. जवळपास 30 सेकंद या भूकंपाची तीव्रता जाणवली. त्यानंतर काही मिनिटातच हा सामना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला. पण या कालावधीत ड्रेसिंग रूममधील खेळाडूंनी मैदानात धाव घेतली. यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. क्रिकेट आयर्लंडने एक्सवर लिहिलं की, ‘वाह! भूकंपाच्या एका हलक्या धक्क्यानंतर सामना थांबवला गेला.’ 2022 मध्ये अशीच एक घटना घडली होती. तेव्हा झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात अंडर 19 सामना सुरु होता. तेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले आणि सामना थांबवावा लागला होता.
Earthquake in BAN vs IRE match live! #CricketTwitter #Ashes2025 pic.twitter.com/ZHDZA6HDvA
— Swapnil Mishra (@swapnil95mishra) November 21, 2025
आयर्लंड बांग्लादेश कसोटी
दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येत आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 476 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने 265 धावा केल्या. बांगलादेशकडे पहिल्या डावात 211 धावांची आघाडी आहे. त्याच्या पुढे खेळताना बांग्लादेशने 100हून अधिक धावांची भर घातली आहे. यात आणखी वाढ होईल यात काही शंका नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. आता उर्वरित दोन दिवसात काय होतं याकडे लक्ष लागून आहे.
