युवराज-धवन आणि रैनाला ईडीचा मोठा धक्का, कोट्यवधींची संपत्ती होणार जप्त?
क्रिकेटपटू युवराज सिंग, शिखर धवन आणि सुरेश रैना यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने या खेळाडूंची चौकशी केली होती. आता या खेळाडूंच्या कोट्यवधींची संपत्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

1xBet Money Laundering Case: ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या 1xBet चं प्रमोशन माजी क्रिकेटपटूंना भोवणार असल्याचं दिसत आहे. कारण या प्रकरणात माजी क्रिकेटपटूंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. युवराज सिंग, शिखर धवन, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आता या खेळाडूंच्या संपत्तीवर टाच येणार असल्याची चर्चा रंगली आहे. बेटिंग अॅपच्या प्रमोशनच्या बदल्यात दिग्गज व्यक्तींना एंडोर्समेंट फी दिली गेली होती. या एंडोर्समेंट फीद्वारे खरेदी केलेल्या मालमत्ता “गुन्ह्यातून मिळालेलं उत्पन्न” म्हणून ईडीने निश्चित केले आहे. ईडीच्या चौकशीनुसार, या खेळाडूंनी या अॅपच्या जाहिरातीतून कोट्यवधी रुपये कमावले. तसेच मिळालेल्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
ईडीच्या रडारवर असलेल्या दिग्गजांची संपत्ती विदेशात असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ईडीने तसा संशय व्यक्त केला आहे. आता ईडी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. मनी लाँड्रिंग संबंधित दुवे उघड करण्यासाठी त्यांची बँक खाती, व्यवहार आणि मालमत्ता व्यवहारांची तपासणी ईडीकडून केली जात आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंना आता कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागू शकतं. पण विदेशातील मालमत्त जप्त करण्यासाठी काही कारवाई करेल की नाही हे स्पष्ट नाही. दुसरीकडे, जाहिरातीतून मिळालेल्या एंडोर्समेंट फीमधून क्रिकेटपटूंनी देशात किती मालमत्ता खरेदी केली हे देखील अद्याप स्पष्ट नाही.
क्रिकेटपटू व्यतिरिक्त फिल्मी जगतातील नावंही या प्रकरणात गुंतली आहेत. सोनू सूद, मिमी चक्रवर्ती आणि अंकुश हजरा यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. उर्वशी रौतेला तर 1xBet ची भारतीय अँबेसेडर होती. त्यामुळे तिलाही समन्स पाठवण्यात आला होता. पण सध्या ती परदेशात असल्याने ईडीसमोर उपस्थित राहू शकली नाही. दरम्यान, 1xBet चं भारतात मोठं नेटवर्क आहे. तसेच 22 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. या प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते गेल्या महिन्यात वेगाने वाढले होते. दुसरीकडे, केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. त्यामुळे कायद्याचा फास आणखी आवळला जाणार आहे.
