ENG vs IND : मला तमाशा…, कॅचेस ड्रॉप करण्यावरुन जसप्रीत बुमराह स्पष्टच म्हणाला
Jasprit Bumrah On Dropped Catches : भारताने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात एकूण 6 कॅचेस सोडल्या. त्यापैकी 3 कॅचेस या एकट्या यशस्वी जैस्वाल याने सोडल्या. भारतीय खेळाडूंनी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एकूण 3 कॅचेस सोडल्या. बुमराह यावरुन काय म्हणाला? जाणून घ्या.

भारताच्या खेळाडूंनी इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक फिल्डिंग केली. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 1, 2 नाही तर तब्बल 6 कॅचेस सोडल्या. त्यामुळे टीम इंडियाला 471 धावा करुनही फक्त 6 धावांची नाममात्र आघाडीच मिळाली. इंग्लंडने पहिल्या डावात 465 रन्स केल्या आणि टीम इंडियाला मोठी आघाडी मिळवण्यापासून रोखलं. टीम इंडियाने या कॅचेस ड्रॉप केल्याने सामन्यावरील पकड गमावली. निराशाजनक म्हणजे या 6 पैकी 3 कॅचेस एकट्या जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर सुटल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बुमराहने टीम इंडियाच्या खेळाडूंनी कॅचेस सोडण्यावरुन प्रतिक्रिया दिली.
जसप्रीत बुमराह काय म्हणाला?
“जेव्हा कॅच सुटते तेव्हा मी एका क्षणासाठी निराश होतो. हा खेळाचा भाग आहे. खेळाडू नवे आहेत आणि ते कठोर मेहनत करत आहेत. मला कोणताच तमाशा करायचा नाही आणि त्यांच्यावर दबाव टाकायचा नाही. कुणीही जाणीवपूर्वक असं करत नाही”, असं बुमराहने पत्रकार परिषेदत म्हटलं.
“झेल सुटणं हा खेळाचा एक भाग आहे.आपल्याला याबाबत अधिक विचार करण्यापेक्षा पुढील खेळावर लक्ष केंद्रीत करायला हवं. स्वाभाविक आहे की कॅचेस घेतल्या असल्या तर फार चांगलं असतं. मात्र खेळाडू यातूनच शिकतात”, असं बुमराहने नमूद केलं.
तसेच बुमराहने त्याच्यावर बॉलिंग एक्शनवरुन टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिलं आहे. “लोकांना वाटायचं की मी या सर्व वर्षांमध्ये फक्त 8 महिने खेळेन. काहींनी म्हटलं की 10 महिने खेळेन. मात्र मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्ष तर 12-13 आयपीएल खेळलो आहे”, असं टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाने म्हटलं.
“इतकंच काय आताही लोकं (प्रत्येक दुखापतीनंतर) म्हणतात की हा पुढे खेळू शकणार नाही. त्यांना बोलु द्या. मी आपलं काम करत राहिन. दर 4 महिन्यांनी या अशा गोष्टी समोर येत राहतील.मात्र जेव्हापर्यंत देवाची कृपा आहे तोवर मी खेळत राहिन”, असं बुमराहने स्पष्टपणे सांगितलं.
लीड्समध्ये विकेट्सचा पंजा
दरम्यान बुमराहने इंग्लंडला 465 रन्सवर ऑलआऊट करण्यात निर्णायक भूमिका बजावली. बुमराहने 24.4 ओव्हरमध्ये 83 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. बुमराहची कसोटीत 5 विकेट्स घेण्याची 14 वी वेळ ठरली. जसप्रीत बुमराह याने यासह आणखी एक विक्रम केला. जसप्रीत सेना देशात (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 150 विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला.
