IND vs ENG : केएल राहुलचा इंग्लंड दौऱ्यात धमाका, कारकीर्दीत पहिल्यांदाच अविस्मरणीय कामगिरी
KL Rahul IND vs ENG 5th Test : केएल राहुल याला पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही. केएलने 14 धावा केल्या. मात्र केएलने यासह मोठी कामगिरी केली. जाणून घ्या.

इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे टीम इंडियाचं इंग्लंड दौऱ्यात कसं होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच या दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे दोघेच अनुभवी खेळाडू होते. त्यामुळे या दोघांवर मोठी जबाबदारी होती. मात्र या दोघांनी आतापर्यंत या मालिकेत अपेक्षेपेक्षा भारी कामगिरी करत निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला आहे. केएलने या मालिकेत भारतासाठी सलामीची जबाबदारी सांभाळली. इतकंच नाही तर केएलने भारताला चांगली सुरुवात करुन देण्यात निर्णायक भूमिका बजावलीय. केएलने इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात 14 धावा केल्या. केएलने यासह पहिल्यांदाच कसोटी कारकीर्दीत अविस्मरणीय कामगिरी करुन दाखवली आहे. केएलने नक्की काय केलंय? हे जाणून घेऊयात.
केएलने पहिल्या डावात 40 चेंडूचा सामना करत 1 चौकारसह 14 धावा केल्या. केएलने यासह खास कामगिरी केली. केएलने या मालिकेत 500 धावांचा टप्पा पार केला. तसेच केएलने या मालिकेत 2 शतकंही झळकावली आहेत. सोबतच केएलने या मालिकेत 1 हजार 38 चेंडूंचा सामना केलाय. केएलची अशाप्रकारे एकाच मालिकेत 2 शतकं, 500 पेक्षा अधिक धावा आणि 1 हजार पेक्षा यशस्वीरित्या चेंडूंचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
दुसऱ्या डावात मोठ्या विक्रमाची संधी
केएलला पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. मात्र केएलला इंग्लंड दौऱ्यातील शेवटच्या डावात मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. भारतासाठी इंग्लंडमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. केएलला यासाठी फक्त 31 धावांचीच गरज आहे.
गावसकरांनी इंग्लंडमध्ये ओपनर म्हणून खेळताना 15 कसोटी सामन्यांमध्ये 14.14 च्या सरासरीने 1 हजार 152 धावा केल्या होत्या. तर केएलने 13 कसोटीत 1 हजार 122 धावा केल्या आहेत. आता केएल दुसऱ्या डावात 31 धावा करत लिटिल मास्टर यांना पछाडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान केएलने या मालिकेत आतापर्यंत 5 सामन्यांमधील 9 डावांमध्ये 58.33 च्या सरासरीने आणि 50.57 अशा स्ट्राईक रेटने एकूण 525 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 68 चौकार लगावले आहेत.
