IND vs SA : टीम इंडियाची कमकुवत बाजू उघड! कर्णधार केएल राहुलकडेही उत्तर नाही
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 3 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार केएल राहुल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला. यावेळी टीम इंडियाची कमकुवत बाजू अधोरेखित झाली आणि त्याचं उत्तर केएल राहुल देऊ शकला नाही.

दक्षिण अफ्रिकेने भारताला कसोटीत धोबीपछाड दिल्यानंतर वनडेतही धाकधूक वाढली आहे. कारण दक्षिण अफ्रिकेने भारतीय क्रिकेट संघाची कमकुवत बाजू बरोबर पकडली आहे . त्यामुळे क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. गेल्या काही वर्षात कमकुवत बाजूमुळे भारताची नाचक्की होताना दिसत आहे. सध्यातरी त्यावर काही तोडगा निघेल असं वाटतं नाही. ही कमकुवत बाजू दुसरी तिसरी काही नाही तर फिरकीचा सामना करण्यास फलंदाज अकार्यक्षम ठरत आहे. मागच्या तीन चार वर्षात प्रत्येक फलंदाजाची ही बाजू कमकुमत असल्याचं दिसून आलं आहे. कसोटी मालिकेत ही बाजू गडदपणे अधोरेखित झाली आहे. आता फलंदाजही ही बाब स्वीकारत आहेत. कर्णधार केएल राहुलने मान्य केलं की, त्याच्याकडेही याचं उत्तर नाही.
केएल राहुलने पत्रकार परिषदेत सांगितलं की, “गेल्या काही वर्षात आपण फिरकी गोलंदाजांना चांगले खेळू शकलो नाही. खरे म्हणजे, मला माहित नाही की आपण ते कसे करायचो (स्पिन खेळा) आणि आता आपण ते का करू शकत नाही. मलाही उत्तर माहित नाही. आपण फक्त वैयक्तिकरित्या आणि फलंदाजी गट म्हणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकतो.” केएल राहुल स्वतः फिरकीपटूंना बळी पडला आहे आणि आता तो स्वतः कबूल करतो की त्याच्याकडे याचे उत्तर नाही. केएल राहुलच नाही तर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजांकडे किंवा कोचिंग स्टाफकडे सध्या या समस्येचे उत्तर दिसत नाही.
केएल राहुल म्हणाला की, ‘फलंदाजांना तांत्रिक आणि रणनीतिक बदलांचा विचार करावा लागेल. ही एक दीर्घ प्रक्रिया असेल. ती एका रात्रीत बदलणार नाही. आम्हाला आवश्यक असलेल्या सुधारणांवर आम्ही लक्ष देऊ आणि श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी चांगल्या प्रकारे तयारी करण्याची आशा करू. आम्ही स्पिन खूप चांगले खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंकडून सल्ला देखील घेऊ.’ भारत आणि दक्षिण अफ्रिका पहिला सामना रांचीत होणार आहे. या सामन्यासाठी असलेली खेळपट्टी कशी आहे याबाबत स्पष्ट काही माहिती नाही. ही खेळपट्टी फलंदाजांना पूरक असण्याची शक्यता आहे. जर तसं असेल तर त्या पद्धतीने प्लेइंग 11 निवडली जाईल.
