इंग्लंडला पाचव्या कसोटीत असं करणं नडलं, मोहम्मद सिराजच्या चुकीचा फायदा झाला पण…
भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात इंग्लंडकडे मालिका विजयाची संधी होती. पण भारतीय संघाने इंग्लंडला चांगलंच झुंजवलं. चौथ्या सामन्यात चिवट खेळी, तर पाचवा सामना जिंकला. पाचव्या सामन्यात इंग्लंडला एक चूक नडली.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचवा सामन्यातील विजय भारताने इंग्लंडच्या घशातून काढला. खरं तर चौथ्या दिवशी हा सामना इंग्लंड सहज जिंकेल अशी स्थिती होती. भारताने दिलेल्या 374 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची स्थिती भक्कम होती. त्यात मोहम्मद सिराजने सीमेवर हॅरी ब्रूकचा झेल पकडताना चूक केली आणि त्याचा फटका टीम इंडियाला बसला. एकूण 92 धावांचा भुर्दंड टीम इंडियाला भरावा लागला. कारण त्यानंतर हॅरी ब्रूकने शतकी खेळी केली. हॅरी ब्रूकचा बाद करण्याची संधी सुटली तेव्हा तो 19 धावांवर खेळत होता. विकेट तर गेली वरून 6 धावा फुकटच्या मिळाल्या. हॅरी ब्रूक आणि जो रूटने चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. इंग्लंडची 301 धावांवर 3 गडी अशी स्थिती होती. तर जो रूट आणि हॅरी ब्रूक खेळत होते. त्यामुळे हा सामना हातून गेला असंच वाटत होतं. इंग्लंडला विजयासाठी 73 धावांची गरज होती. त्यामुळे हॅरी ब्रूकने फटकेबाजी करण्यासाठी पुढे सरसावला आणि तिथेच चूक झाली.
आकाश दीपच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना हॅरी ब्रूक फसला आणि सिराजने त्याचा झेल घेतला. येथूनच इंग्लंडचं पतन सुरु झालं. 332 धावा असताना जेकब बेथेल बाद झाला. त्याने फक्त 5 धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णाने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर अवघ्या पाच धावानंतर जो रूटला प्रसिद्ध कृष्णाने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर सामना हळूहळू भारताच्या पारड्यात झुकण्यास सुरुवात झाली. पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील दुसर्या षटकात जेमी स्मिथची विकेट 347 धावा असताना मोहम्मद सिराजला मिळाली. 354 धावा असताना जेमी ओव्हरटनला मोहम्मद सिराजने पायचीत केलं. 357 धावांवर जोश टंगचा त्रिफळा प्रसिद्धने उडवला. पण गस एटकिनसन झुंज देत होता. अखेर सिराजने त्याला क्लिन बोल्ड केलं आणि भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला.
हॅरी ब्रूकची विकेट मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने हा सामना भारताच्या पारड्यात झुकण्यास सुरुवात झाली. जो रूट आणि हॅरी ब्रूक ही जोडी फुटली आणि भारताला संधी मिळाली. जर ही जोडी आणखी 20-30 धावांसाठी टिकली असती तर भारताचं पुढचं गणित कठीण झालं असतं. विशेष म्हणजे दुखापतग्रस्त असलेला ख्रिस वोक्स एकही चेंडू खेळला नाही.
