“मला धक्का बसला, त्याने मला पाहिलंही नव्हतं आणि..”, नितीश कुमार रेड्डीने सांगितला पॅट कमिन्सचा किस्सा
आयपीएल 2024 स्पर्धेत तरुण खेळाडूंनी आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे काही जणांची भारतीय संघात वर्णी लागली. असं असताना सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने एक किस्सा सांगितला आहे. यात त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्सबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2024 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. पण अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 8 विकेट आणि 57 चेंडू राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण संपूर्ण डावच गडगडला आणि 113 धावा करता आल्या. हे आव्हान कोलकात्याने 10.3 षटकात पूर्ण केलं. असं असलं तरी संपूर्ण स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाने आक्रमक खेळी केली. विरोधी संघांवर तुटून पडले होते. पण पुढच्या पर्वात पॅट कमिन्स कर्णधारपदी राहील की नाही याबाबत शंका आहे. पण त्याच्या कर्णधारपदावर अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी याने स्तुतीसुमनं उधळली आहेत. पॅट कमिन्स किती सावध आणि पारखी नजर ठेवणारा आहे, याची अनुभूती त्याने सांगितली. कमिन्स हैदराबाद संघात रूजू होण्यापूर्वीच त्याला संघाची खडानखडा माहिती होती.
“पॅट कमिन्स आयपीएलच्या फक्त तीन दिवसाआधी संघात ज्वॉईन झाला.”, असं नितीश कुमार रेड्डी याने न्यूज 18शी बोलताना सांगितलं. ‘मी सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. माझ्या खेळीने प्रशिक्षकही प्रभावित झाले होते. पण याबाबत कर्णधाराला कळावं यासाठी अट्टाहास होता.’, असं नितीशने सांगितलं. खरंच त्याला मी कसा खेळतो याची कल्पना असेल का? या प्रश्नात नितीश गुंतला होता. पण जेव्हा पॅट कमिन्स संघासोबत आला तेव्हा त्याने सांगितलं की, “नितीश, तू खरंच खूप छान खेळतो.” त्याचं हे वाक्य ऐकून नितीशला धक्का बसला. त्याने मला कधीच खेळताना पाहिलं नव्हतं. तर त्याला याबाबत कसं कळलं असावं, या प्रश्नात पुन्हा एकदा नितीश गुंतला होता. पण त्याबाबतच उलगडा पॅट कमिन्सने त्याच्याकडे केला.
“मला धक्का बसला. त्याला कसं कळलं की मी चांगली फलंदाजी करतो? त्याने मला कधीच सराव करताना पाहिलं नाही. तेव्हा मी त्याला विचारलं की माझ्याबाबत कसं माहिती पडलं. तेव्हा त्याने सांगितलं की, माझे बॅटिंग करतानाचे व्हिडीओ त्याने यूट्यूबवर पाहिले आहेत. तसेच माझ्या क्षमतेचं कौतुक केलं. त्यामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली.”, असं नितीश कुमार रेड्डीने सांगितलं. पॅट कमिन्स आयपीएलसाठी भारतात येण्यापूर्वी सर्वच अभ्यास करून आला होता, असंही तो पुढे म्हणाला.
“मला झिम्बाब्वे मालिकेसाठी संघात स्थान मिळालं होतं. या संदर्भातला कॉल आला तेव्हा मला काय करू आणि काय नको असं झालं होतं. मी माझ्या वडिलांना याबाबत सांगितलं तेव्हा ते आनंदाने रडायला लागले. माझी आईही आनंदी होती. दुर्दैवाने, दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. पण खेळाडूंच्या आयुष्यात असं होत असतं. जे काही घडलं ते स्वीकारायचं असतं. अजून बऱ्याच स्पर्धा आहेत आणि मी त्याच्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. आता जे काय झालं ते झालं. आता ते बदलू शकत नाही.”, असंही नितीश कुमार रेड्डी म्हणाला.
