Icc Champions Trophy 2025 : ‘पाकिस्तान’मुळे Bcci-Pcb यांच्यात सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा वाद
Bcci vs Pcb Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला महामुकाबला होणार आहे. त्याआधी पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे बीसीसीआयने सुरुवातीपासूनच टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास जाहीर विरोध दर्शवला होता. बीसीसीआयच्या या विरोधानंतर आयसीसीने टीम इंडियाच्या सामन्याचं आयोजन हे यूएईत केलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा काही दिवसांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन कार्यक्रमात गैरहजर राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. नक्की काय झालंय? सविस्तर जाणून घेऊयात.
आयसीसी स्पर्धेचं ज्यांच्याकडे यजमानपद असतं त्या देशाचं नाव इतर संघांना आपल्या जर्सीवर छापावं लागतं. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, भारत जर्सीवर पाकिस्तान नाव छापणार नाही, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलं आहे. तसेच या मुद्यावरुन पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतावर पर्यायाने बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत.
पीसीबीचे बीसीसीआयवर आरोप
“बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे. क्रिकेटमध्ये राजकारण आणणं हे खेळाच्या दृष्टीने योग्य नाही. बीसीसीआयने आपल्या संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला. ते त्यांच्या कर्णधाराला (रोहित शर्मा) ओपनिंग सेरेमनीसाठी पाकिस्तानमध्ये पाठवू इच्छित नाही. तर आता काही रिपोर्ट्सनुसार टीम इंडिया त्यांच्या जर्सीवर ‘पाकिस्तान’ हे नाव छापणार नसल्याचं म्हटलं जात आहे. आययीसी या प्रकरणात असं होऊ देणार नाही आणि पाकिस्तानच्या बाजूने निर्णय देईल अशी आम्हाला आशा आहे”, अशी प्रतिक्रिया पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आयसीसी आता या प्रकरणात काय निर्णय घेते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचं नाव
भारताकडे 2023 एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद होतं. तेव्हा पाकिस्तान भारतात आली होती. तसेच तेव्हा पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचं नाव होतं. तसेच याआधीही भारताकडे जेव्हा आयसीसी स्पर्धेचं यजमानपद होतं, तेव्हाही पाकिस्तानच्या जर्सीवर तसा उल्लेख होता. मात्र आता बीसीसीआय तसं करणार नाही, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असणार आहेत. हा हायव्होल्टेज सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
