Odi Cricket : पुन्हा रंगणार या स्पर्धेचा थरार! आयसीसी मोठ्या निर्णयाच्या तयारीत, क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एकदिवसीय क्रिकेट वाढवण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार आयसीसी पुन्हा एकदा बंद करण्यात आलेली स्पर्धा नव्याने सुरु करणार असल्याची चर्चा आहे.

क्रिकेट वर्तुळात गेल्या 15 वर्षांत टी 20i फॉर्मेटची चलती पाहायला मिळत आहे. टी 20i वर्ल्ड कप 2007 नंतर मोठ्या प्रमाणात या सर्वात छोट्या फॉर्मेटने हात पाय पसरले. तर टेस्ट क्रिकेटची क्रेझही आजही कायम आहे. टी 20i आणि टेस्ट क्रिकेटमुळे चाहत्यांची वनडे फॉर्मेटला फारशी पसंती नसल्याचं चित्र आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र वनडे क्रिकेटला पुन्हा एकदा बुस्टर देण्याच्या हिशोबाने आयसीसीने पाऊल टाकलं आहे. त्यामुळे आता आयसीसी त्या अनुषंगाने पुन्हा एकदा वनडे स्पर्धा सुरु करण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसतंय. ही स्पर्धा 2023 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बंद करण्यात आली होती. या स्पर्धेला 2028 पासून पुन्हा सुरुवात होऊ शकते.
या स्पर्धेला जुलै 2020 पासून सुरुवात करण्यात आली होती. वनडे क्रिकेटचं अस्तित्व कायम राखण्याच्या हेतूने ही स्पर्धा सुरु करण्यात आली. मात्र टीमच्या बिजी शेड्यूलमुळे ही स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाचा फटका छोट्या संघाना बसला.
पुन्हा रंगणार स्पर्धेचा थरार!
आयसीसी पुन्हा वनडे सुपर लीग स्पर्धेला नव्याने सुरुवात करण्यासाठी प्लान आखत आहे. वनडे क्रिकेटचा विकास आणि जतन हा या मागील प्रमुख हेतू आहे. आता या स्पर्धेला 2028 पासून पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते. मात्र या स्पर्धेत किती संघ सहभागी होणार? हे निश्चित नाही. न्यूझीलंडचे माजी फलंदाज रोजर टूज यांच्या अध्यक्षतेखालील गटाने आयसीसी बोर्डाला आणि समितीला याबाबतची माहिती दिली आहे.
वनडे सुपर लीग स्पर्धेबाबत थोडक्यात
वनडे सुपर लीग स्पर्धेचं टी 20i वर्ल्ड कपप्रमाणे 2 वर्षांनी आयोजन केलं जातं. या स्पर्धेत प्रत्येक संघ इतर 8 संघांविरुद्ध प्रत्येकी 3 सामने खेळते. यातील 8 पैकी 4 सामने हे घरच्या तर 4 प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राउंडमध्ये सामने खेळवले जातात. अशाप्रकारे प्रत्येक संघ या स्पर्धेत 24 सामने खेळते. या स्पर्धेतील शेवटच्या हंगामात एकूण 13 संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेमुळे दुबळ्या संघांना फायदा
आयसीसी रँकिंगमधील टॉप 10 टीम एकमेकांविरुद्ध वनडे सीरिज खेळतात. त्यामुळे तुलनेत दुबळ्या आणि टॉप 10 मधून बाहेर असलेल्या संघांना अनुभवी संघांसह खेळण्याची संधी मिळत नाही. मात्र या स्पर्धेमुळे ती संधी उपलब्ध होईल, ज्यामुळे त्या संघांना अनुभव मिळेल. तसेच त्यांना दर्जा सुधारता येईल.
तसेच या स्पर्धेव्यतिरिक्त संघ हे एकमेकांविरुद्ध एकदिवसीय सामने खेळतील. त्यानुसार एका मालिकेत 4-5 सामन्यांचा समावेश असेल. मात्र पहिल्या 3 सामन्यांचेच गुण हे सुपर लीग स्पर्धेत ग्राह्य धरले जातील. त्यामुळे आयसीसीने लवकरात लवकर पुन्हा एकदा ही स्पर्धा सुरु व्हावी, अशीच आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
