SL vs SA: श्रीलंकेची टी 20 मधील निच्चांकी धावसंख्या, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 78 धावांचं आव्हान
Sri Lanka vs South Africa: एनरिख नॉर्खिया याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचं लंकादहन केलं. श्रीलंकेचा डाव अवघ्या 77 धावांवर आटोपला.

श्रीलंका क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात निराशाजनक सुरुवात केली आहे. श्रीलंकेचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फुस्स ठरले. श्रीलंकेचा कॅप्टन वानिंदू हसरंगा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेच्या खेळाडूंनी आपल्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला. श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेसमोर शरणागती पत्कारली. श्रीलंकेला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेचा डाव अवघ्या 77 धावांवर आटोपला. श्रीलंकेची ही टी 20 फॉर्मेट आणि टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात निच्चांकी धावंख्या ठरली.
एनरिख नॉर्खियाचा धमाका, श्रीलंकेची घसरगुंडी
श्रीलंकेच्या एकूण चौघांना भोपळाही फोडता आला नाही. कॅप्टन वानिंदू हसरंगा, सदीरा समरविक्रमा, मथीशा पथिराणा आणि एन तुषारा हे चोघे डक आऊट झाले. दोघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाथुम निशांका याने 3 आणि दासून शनाका याने 9 धावा केल्या. तर महीश तीक्षणा 7 धावांवर नाबाद परतला. विकेटकीपर बॅट्समन कुसल मेंडीस याने सर्वाधिक 19 धावांचं योगदान दिलं. अनुभवी ऑलराउंडर अँजलो मॅथ्युजने 16 धावा जोडल्या. तर कमिंदू मेंडीसने 11 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिख नॉर्खिया याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडा आणि केशव महाराज या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ओटनील बार्टमन याच्या खात्यात 1 विकेट गेली.
श्रीलंकेचं दक्षिण आफ्रिकेकडून पानिपत
Sri Lanka unfortunately bowled out for 77. Let’s give our best effort to defend this! #T20WorldCup #LankanLions #SLvSA pic.twitter.com/Op6VXTXVcu
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 3, 2024
श्रीलंकेची टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निच्चांकी धावसंख्या
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 77, आज
विरुद्ध टीम इंडिया, 82, 2016
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 87, 2010
विरुद्ध टीम इंडिया, 87, 2017
विरुद्ध इंग्लंड, 91, 2021
श्रीलंकेचा टी 20 वर्ल्ड कपमधील लोवेस्ट स्कोअर
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 77, आज
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 87, 2010
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 101, 2007
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: वानिंदू हसरंगा (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि नुवान तुषारा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि ओटनील बार्टमन.
