IPL 2025 : अर्जून तेंडुलकरला ख्रिस गेलसारखं तयार करेल! युवराजकडून घेणार धडे? माजी क्रिकेटपटूचा सल्ला
आयपीएल 2025 स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर फक्त नावाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आयपीएलच्या या पर्वात त्याने एकही सामना खेळलेला नाही. मुंबई इंडियन्स संघात दिग्गज खेळाडू असताना संधी मिळणंही कठीण दिसत आहे. असं असताना योगराज सिंग यांनी अर्जुन तेंडुलकरला एक सल्ला दिला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी सुरुवातीला निराशाजनक राहिली होती. त्यानंतर जोरदार कमबॅक केलं आणि तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता उरलेल्या पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. असं असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या पर्वातही संधी मिळताना दिसत नाही. संघात आहे मात्र डगआऊटमध्ये बसण्याशिवाय पर्यात नाही कारण मुंबई इंडियन्स संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. अशा स्थितीत प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणं खूपच कठीण आहे. पण युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी अर्जुन तेंडुलकरबाबत एक दावा केला आहे. अर्जुनला युवराज सिंग ख्रिस गेलसारखा फलंदाज करू शकतो. योगराज सिंगने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘अर्जुन तेंडुलकरमध्ये क्षमता आहे आणि खासकरून फलंदाजी दमही आहे.’ योगराज सिंग यांनी पुढे सांगितलं की, ‘जर युवराजकडे अर्जुन तेंडुलकरला ट्रेन करण्याची जबाबदारी सोपवली तर तो त्याला ख्रिस गेलसारखा फलंदाज करेल.’
योगराज सिंगने सांगितलं की, ‘मी अर्जुनला सांगितलं की गोलंदाजी ऐवजी फलंदाजीवर लक्ष केंद्रीत कर. सचिनच्या मुलाला तीन महिने युवराज सिंगकडून ट्रेनिंग घेतली पाहीजे. मी पैज लावतो की तो त्याला ख्रिस गेल बनवेल.’ आयपीएल स्पर्धेत युवराज सिंगचे दोन शिष्य नाव कमवत आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आणि सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक ओपनर अभिषेक शर्मा हे दोघेही युवराज सिंगच्या मुशीत घडले आहेत. युवराज सिंग या दोघांसोबत कायम फोनवरून चर्चा करत असतो.
अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघात फक्त नावाला आहे, अशी चर्चा रंगली आहे. त्याला अजूनही प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मागच्या पर्वात काही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण या वर्षी संधी मिळणं कठीण आहे. इतकंच काय तर अर्जुन तेंडुलकर आयपीएल लिलावात अनसोल्ड राहीला होता. शेवटी मुंबईने त्याला 30 लाख खर्च करून संघात घेतलं. अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळतो. विजय हजारे स्पर्धेत त्याने गोव्यासाठी चांगली कामगिरी केली होती. अरुणाचलविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. पण आयपीएलच्या या पर्वात गोलंदाजीची संधी मिळाली नाही.
