IND vs SA : गुवाहाटी कसोटीत या पाच भारतीय खेळाडूंनी नाक कापलं! जाणून घ्या सविस्तर
गुवाहाटी कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला आणि मालिका 2-0 ने गमावली. दुसऱ्या कसोटी कसोटी सामन्यात 408 धावांनी भारताचा पराभव झाला. दुसऱ्या डावात भारताला फक्त 140 धावा करता आल्या. या पराभवासाठी पाच खेळाडू जबाबदार आहेत. चला जाणून घेऊयात.

IND vs SA 2nd Test: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 408 धावांनी पराभव झाल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. इतक्या वाईट पद्धतीने पराभव झाल्याचं क्रीडाप्रेमींच्या पचनी पडत नाही. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 201 धावा करता आल्या. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला 288 धावांची मजबूत आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात यात आणखी धावांची भर घालत टीम इंडियासमोर विजयासाठी 549 धावांचं आव्हान दिलं. पण या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 140 धावा करू शकली. भारताची फलंदाजी या सामन्यातही निष्फळ ठरली. आपल्या देशात फिरकीविरुद्ध खेळतान टीम इंडियाला अडचणीचा सामना करावा लागला. दक्षिण अफ्रिकेने भारताला 25 वर्षानंतर 2-0 ने पराभूत केलं. या पराभवासाठी पाच खेळाडू जबाबदार ठरले.
यशस्वी जयस्वाल : पहिल्या डावात यशस्वीला सूर गवसला होता. मात्र त्याचं रुपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयश आलं. त्याने पहिल्या डावात 7 चौकार आणि 1 षटकार मारत 58 धावा केल्या. पण दुसऱ्या डावात त्याची गाडी रूळावरून घसरली. दुसऱ्या डावात फक्त 13 धावा करून बाद झाला. दोन्ही डावात मिळून त्याने 71 धावाच केल्या.
केएल राहुल : वनडे संघाची धुरा असलेल्या केएल राहुलने दोन्ही डावात निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या डावात 63 चेंडूंचा सामना केला आणि 2 चौकार मारत 22 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात अवघ्या 6 धावांवर बाद झाला. त्याने या सामन्यात फक्त 28 केल्या. पाटा विकेटवर त्याची अशी फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे.
साई सुदर्शन : या पराभवासाठी तिसरा जबाबदार खेळाडू हा साई सुदर्शन आहे. त्याने दोन्ही डावात माती खाल्ली. पहिल्या डावात 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावातही 14 करून तंबूत परतला. त्याला वारंवार संधी देऊनही काही खास करताना दिसत नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
ध्रुव जुरेल : या सामन्यातील पराभवाचा चौथा गुन्हेगार हा ध्रुव जुरेल आहे. पहिल्या डावात त्याला खातंही खोलता आलं नाही. तर दुसऱ्या डावात फक्त 2 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे दोन्ही डावात त्याने काहीच केलं नाही. त्यामुळे मधली पूर्णपणे कमकुवत ठरली.
ऋषभ पंत : दुसऱ्या कसोटी सामन्याची धुरा पंतच्या खांद्यावर होती. पण त्याचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. पहिल्या डावात चुकीचा फटका मारून तंबूत परतला. तेव्हा त्याने फक्त 7 धावा केल्या. दुसऱ्या डावात फक्त 13 धावा करता आल्या. त्यामुळे या सामन्यात पराभवाचं दरीत ढकललो गेलो.
