IND vs SA : दुसरा सामना प्रतिष्ठेचा, टीम इंडियात बदल फिक्स! कशी असणार प्लेइंग ईलेव्हन?
IND vs SA 2nd Test Playing 11 : भारतीय संघाचा पहिल्याच कसोटीत तिसर्या दिवशी पराभव झाल्यानंतर टीम मॅनेजमेंट एक्शन मोडमध्ये आली आहे. टीम मॅनेजमेंट दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली एकूण तिसरी आणि मायदेशातील दुसरी कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. टीम इंडिया या 2 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. भारताला कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी पराभूत व्हावं लागलं. टीम इंडिया 124 धावा करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 93 वर ऑलआऊट करत पहिला सामना हा 30 धावांनी जिंकला.
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतासाठी दुसरा आणि अंतिम सामना हा करो या मरो असा आहे. भारताला 0-2 ने व्हाईटवॉश टाळायचा असेल तर कोणत्याही स्थितीत दुसऱ्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. भारतासाठी दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा आहे. त्यामुळे भारताची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भारताने अवघ्या काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात 0-3 अशा एकतर्फी फरकाने कसोटी मालिका गमावली होती. त्यामुळे आता पुन्हा व्हाईटवॉश व्हायचं नसेल तर भारताला दुसरा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
दुसरा सामना कुठे?
दुसरा सामना हा 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. हा सामना गुवाहाटीत होणार आहे. कॅप्टन शुबमन गिल मानेच्या दुखापतीमुळे पहिल्या डावात रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर गिल बॅटिंगसाठी आलाच नाही. त्यामुळे गिल न खेळल्याचा फटका भारताला बसला. तसेच पहिल्या सामन्यात इतर भारतीय फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वाढली आहे.
शुबमन दुखापतीनंतरही टीम इंडियासोबत कोलकातावरुन गुवाहाटीला गेला. मात्र शुबमन खेळणार की नाही? याबाबतचा निर्णय हा सामन्याच्या 1 दिवसआधी घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
शुबमनच्या जागी कोण?
शुबमन गिल याला य़ा दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे खेळता आलं नाही तर मग त्याच्या जागी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शुबमनच्या जागी नितीश कुमार रेड्डी आणि देवदत्त पडीक्कल या तिघांपैकी कुणालाही संधी दिली जाऊ शकते. तसेच वॉशिंग्टन सुंदर याने तिसऱ्या स्थानी समाधानकारक कामगिरी केली. मात्र वॉशिंग्टनच्या जागी साई सुदर्शन याला संधी मिळू शकते.
भारताची दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल/देवदत्त पडीक्कल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल.
