IND vs SA : रोहित शर्मा याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी कशी? हिटमॅनच्या इतक्या धावा
Rohit Sharma India vs South Africa Odi Series : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला मोजून आता काही तास बाकी आहेत. या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची अनुभवी जोडी खेळताना दिसणार आहे.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यांनतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा याने या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी सरावाला सुरुवात केलीय. रोहितने विराट कोहली याच्यासह ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात तडाखेदार खेळी केली होती. क्रिकेट चाहत्यांना रोहितकडून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशाच स्फोटक खेळीची अपेक्षा असणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या निमित्ताने रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये एकूण किती धावा केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
रोहित शर्मा याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची आकडेवारी
रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एकूण 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत. रोहितने या 26 सामन्यांमध्ये 806 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 3 शतक आणि 2 अर्धशतकं लगावली आहेत. तसेच रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 86 चौकार आणि 20 षटकारही लगावले आहेत.
हिटमॅन रोहित 2 वर्षानंतर खेळण्यासाठी सज्ज
रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना हा 2 वर्षांपूर्वी खेळला होता. रोहितने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 24 बॉलमध्ये 40 रन्स केल्या होत्या. रोहितने या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार खेचले होते.
हिटमॅनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी
रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सीरिजमधील केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रोहितने दुसर्या वनडेत 73 धावा कुटल्या होत्या. तर रोहितने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात शतक झळकावलं होतं. रोहितने 121 धावांची खेळी केली होती. रोहितच्या या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं.
रोहितसोबत ओपनिंग कोण करणार?
दरम्यान शुबमन गिल याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. शुबमन ओपनिंगही करतो. तसेच शुबमन गरजेनुसार तिसर्या स्थानीही खेळतो. मात्र आता शुबमन नाही. त्यामुळे रोहितसोबत ओपनिंग कोण करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. टीम इंडियात सध्या यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे दोघे ओपनर आहेत. त्यामुळे यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांपैकी कुणाला ओपनिंगची संधी मिळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
