
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात धमाका केला आहे. भारताने झिंबाब्वे विरुद्ध चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये इतिहास घडवला आहे. भारताने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. भारताने झिंबाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 256 धावा केल्या. त्यामुळे आता झिंबाब्वे करो या मरो सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजंसमोर कितपत प्रतिकार करण्यात यशस्वी ठरतात हे निकालानंतर स्पष्ट होईल.
झिंबाब्वे टॉस जिकंला. कॅप्टन सिकंदर रझा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही बॅटिंग करण्याचा निर्णय आनंदाने स्वीकारला. टीम इंडियाने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. टीम इंडियाच्या पहिल्या 6 फलंदाजांनीच झिंबाब्वेच्या गोलंदाजांना झोडून काढला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी विस्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी 48 धावांनी सलामी भागीदारी केली. संजूच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. संजूने 24 धावा केल्या.
अभिषेक आणि इशान किशन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत दे दणादण फटके मारले. दोघांनी 42 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. इशान किशन याला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र सिकंदर रझा याने इशानला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. इशानने 38 रन्स केल्या. इशान आऊट झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्या आणि अभिषेक या दोघांनी 13 चेंडूत 30 धावा जोडल्या. अभिषेक 55 रन्स करुन आऊट झाला. सूर्यकुमार यादव याने 33 धावांचं योगदान दिलं.
सूर्या आउट झाल्याने भारताचा स्कोअर 14.5 ओव्हरमध्ये 4 आऊट 172 असा झाला. मात्र त्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनी 31 बॉलमध्ये सामन्याचं चित्र बदललं. या जोडीने 31 बॉलमध्ये नॉट आऊट अर्धशतकी पार्टनरशीप करत सामन्याचं चित्रच बदललं. तिलक आणि हार्दिक या दोघांनी फिनिशिंग टच देत 31 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे भारताला 256 रन्सपर्यंत पोहचता आलं. हार्दिकने 23 बॉलमध्ये नॉट आऊट 50 रन्स केल्या. तर तिलकने 16 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. तर झिंबाब्वेच्या 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.