IND vs BAN : आर अश्विनने बांगलादेशी गोलंदाजांचं घातलं ‘श्राद्ध’, पितृपक्षात दाखवले ‘कावळे’
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. असं असताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. पण आर अश्विनने टीम इंडियाची लाज राखली. जिथे 200 धावा होतील की नाही अशी स्थिती होती तिथे 250 धावांचा पल्ला गाठला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी भारत आणि बांग्लादेश यांच्यात महत्त्वपूर्ण कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरु आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर बांगलादेशचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. पहिल्या दिवशीच त्याची झलक दिसून आली. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्या दोन सत्रात भारताची पिसं काढली. यशस्वी जयस्वाल वगळता आघाडीचा एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे अवघ्या 144 धावांवर 6 विकेट अशी स्थिती होती. त्यामुळे टीम इंडियाचं काय खरं नाही असंच वाटत होतं. पण लोकल बॉय आणि कसोटीत कायमच टीम इंडियाचा तारणहार राहिलेल्या आर अश्विनने भारताचा मोर्चा सांभाळला. त्याला रवींद्र जडेजाची उत्तम साथ लाभली. दोघांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तसेच आर अश्विनने अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणलं. चेपॉकच्या खेळपट्टीचा चांगला अंदाज असल्याचं आर अश्विननं दाखवून दिलं. आर अश्विनने 58 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 15 वं अर्धशतक झळकावलं. पण या अर्धशतकाचं महत्त्व काही वेगळंच आहे. जर त्याने डाव सावरला नसता तर कदाचित भारताचा डाव 200 धावांचा आत गुंडाळला गेला असता. तसेच बांगलादेशचा संघ भारतावर पहिल्याच डावात हावी झाला असता. आर अश्विनची ही खेळी त्याच्या वडिलांनी व्हिआयपी रुममध्ये बसून पाहिली हे विशेष..
आर अश्विन तसं पाहिलं तर गोलंदाजीसाठी म्हणूनच प्रसिद्ध आहे. पण त्याची फलंदाजी एखाद्या फलंदाजाला लाजवेल अशी आहे. आर अश्विनने यापूर्वी अशा इनिंग खेळल्या आहेत. यापूर्वी आर अश्विनने कसोटीत पाच शतकं ठोकली आहेत. टीएनपीएलमध्ये त्याने सलग तीन अर्धशतकं ठोकली असून संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. आता टीम इंडियाच्या वाईट स्थितीत त्याने चांगली खेळी केली आहे.