आरसीबीला यश मिळताच विजय माल्या झाला जागा, 36 शब्दात सर्वकाही पण….
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुणतालिकेत थेट पहिलं स्थान गाठलं आहे. संघाच्या विजयानंतर आरसीबीच्या जुन्या मालकाचं प्रेम उतू आले आहे. त्याने याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धेत रजत पाटिदारच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चांगली कामगिरी केली आहे. प्लेऑफमधील स्थान आता फक्त एक विजय दूर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा हिशेब चुकता केला आहे. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. इतकंच काय तर स्टार फलंदाज विराट कोहलीने ऑरेंज कॅप पटकावली आहे, तर जोश हेझलवूड पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. यामुळे सर्व काही यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पथ्यावर पडत असल्याचं दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 पैकी 7 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. आरसीबीचे 14 गुण आणि +0.521 नेट रनरेट आहे. या कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा जुना मालक विजय माल्या खूश झाला आहे. त्याने या विजयानंतर सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 46 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट राखून पराभव केला. या विजयानंतर विजय माल्याने ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिलं की, ‘दिल्ली कॅपिटल्सवर मिळवलेल्या शानदार विजयासाठी आरसीबीला शुभेच्छा. सहापैकी सहा सामन्यात विजय.. आयपीएलमध्ये रेकॉर्ड होणार आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅप संघासाठी बोनस आहे. आतापर्यंतची कामगिरी जबरदस्त आहे. अशाच हिम्मतीने खेळत राहा.’ या ट्वीटमध्ये गेली 18 वर्षे आरसीबीसाठी खेळणाऱ्या विराट कोहलीचा उल्लेख मात्र टाळला आहे. फक्त ऑरेंज कॅप असा उल्लेख केला आहे. विजय माल्या विविध बँकांचे 9000 कोटींचं कर्ज घेऊन फरार झाला आहे. त्याने 2016 मध्ये सोडला आणि आरसीबीसोबत नातं तोडलं आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित चार पैकी एका सामन्यात विजय हवा आहे. पण टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी चारही सामने जिंकावे लागणार आहे. टॉप 2 मधील संघांना प्लेऑफमधील सामन्यात विजय मिळवला की थेट अंतिम फेरीत स्थान मिळतं. दरम्यान, आरसीबीचा पुढचा चेन्नई सुपर किंग्ससोबत होणार आहे. हा सामन्यात आरसीबीने विजय मिळवला तर प्लेऑफचं स्थान पक्कं होईल. तर चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या जर तरच्या सर्व आशा संपुष्टात येतील. स्पर्धेतून अधिकृतरित्या आऊट होणारा पहिला संघ ठरेल.
