ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, नेमकं झालंय तरी काय? चर्चांना उधाण
आयपीएल 2025 स्पर्धेचा 40 सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सला प्रथम फलंदाजीला उतरावं लागलं. लखनौने 20 षटकात 6 गडी गमवून 159 धावा केल्या आणि विजयासाठी 160 धावा दिल्या. मात्र चर्चा रंगली ती कर्णधार ऋषभ पंतची...

आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मेगा लिलावात ऋषभ पंत सर्वाधिक भाव खाऊन गेला. लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपये मोजले आणि संघात घेतलं. इतकंच काय तर त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुराही सोपवली. मात्र असं असताना ऋषभ पंतची स्पर्धेतील कामगिरी काही खास राहिली नाही. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या महत्वाच्या सामन्यात तर ऋषभ पंतच्या बॅटिंग ऑर्डरवरून चर्चा रंगली आहे. एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरुवात करून दिली. 10 षटकात 87 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची फलंदाजी कोसळली. निकोलस पूरन 9 धावा, अब्दुल समद 2 धावा करून बाद झाला. पण विकेट धडाधड पडत असताना ऋषभ पंत फलंदाजीला कधी उतरणार याची कुजबूज सुरु झाली होती. पण ऋषभ पंत शेवटच्या षटकात आयुष बदोनीची विकेट पडल्यानंतर शेवटचे दोन चेंडू खेळण्यासाठी उतरला.
ऋषभ पंतच्या वाटेला फक्त दोन चेंडू होते. त्यापैकी मुकेश कुमारने टाकलेला पहिला चेंडू निर्धाव गेला. तसेच दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतला क्लिन बोल्ड केलं. त्यामुळे त्याच्या खात्यात फक्त भोपळा आला. पण शेवटचे दोन खेळण्यासाठी उतरण्याचं कारण काय? मिचेल मार्शच्या रुपाने तिसरी विकेट तर 14 व्या षटकातच पडली होती. सहा षटकांचा खेळ बाकी असताना अब्दुल समदला प्रमोशन दिलं. त्यानंतर डेविड मिलर उतरला आणि आयुष बदोनीला संधी मिळाली. पार सातव्या क्रमांकावर आणि तेही दोन चेंडू खेळण्यासाठी ऋषभ पंत उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाणेफेकीवेळी ऋषभ पंत मैदानात उतरला तेव्हा त्याच्या उजव्या हाताला पट्टी लागलेली दिसली. म्हणजेच त्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसत आहे. नाणेफेकीवेळी त्याने त्याबाबत तसं काही सांगितलं नाही. पण सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्याने दुखापत गंभीर असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आयपीएलमध्ये मागच्या 113 डावांमध्ये पंतने सातव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी, 2016 मध्ये आयपीएलमधील त्याच्या पदार्पणाच्या पर्वात दोनदा असेच केले होते.
ऋषभ पंत डावखुरा फलंदाज असल्याने फलंदाजी करताना उजव्या हातावर जास्त ताण येतो. तसेच चेंडू खेळताना अडचण येऊ शकते. स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा विचार करता पंत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही असे दिसते. पण दुसऱ्या डावात पंत लखनौ सुपर जायंट्ससाठी विकेटकीपिंग करत आहे.
