Mumbai Indians : मुंबई इंडियन्सकडून कर्णधाराचं नाव जाहीर, हार्दिक की रोहित?
Mumbai Indians Captain : आयपीएलच्या 17 व्या हंगामात रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला कर्णधार केल्याने क्रिकेट चाहत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता 18 व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून कर्णधार म्हणून खेळाडूचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
रोहित शर्मा याला बाजूला करत हार्दिक पंड्या याला आयपीएल 17 व्या मोसमात कर्णधार करण्यात आलं. मुंबई इंडियन्स टीमला या निर्णयाचा फटका बसला. रोहितकडून कर्णधारपद काढून घेतल्याने क्रिकेट, रोहित आणि मुंबईचे चाहते नाराज झाले. या निर्णयाचा असा परिणाम झाला की मुंबईचा 17 व्या हंगामातील प्रवास हा साखळी फेरीतच संपला. त्यानंतर आता 18 व्या मोसमात कमबॅक करण्यासाठी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. पलटणने आगामी हंगामासाठी 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. तसेच कर्णधाराचं नावही जाहीर केलं आहे.
मुंबईने 5 जणांना कायम ठेवलं आहे. हे पाचही खेळाडू कॅप्ड आहेत. हार्दिक पंड्या याला रिटेन केलं गेलं आहे. तसेच सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा हे देखील मुंबईकडून खेळणार आहेत. तर रोहित शर्मा मुंबईसोबतच आहे. रोहित शर्मा कॅप्टन्सी काढून घेतल्यावर मुंबईची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तसं काही झालेलं नाही. तसेच जसप्रीत बुमराह याला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे. तर सर्वात कमी रक्कम तिलक वर्मा याला मिळणार आहे.
कॅप्टन कोण?
मुंबईने गेल्या वर्षी रोहितचे पंख छाटत हार्दिक पंड्या याला कॅप्टन्सी दिली होती. सर्वात यशस्वी खेळाडूकडून कर्णधारपद काढून घेतल्याने गदारोळ माजला होता. रोहितने त्याच्या नेतृत्वात मुंबईला सर्वात यशस्वी संघ ही बिरुदावली मिळवून दिली. रोहितने मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मात्र त्यानंतरही याचा विचार न करता हार्दिकला कॅप्टन केलं. मात्र वाढत्या विरोधानंतर आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी रोहितला कॅप्टन केलं जाणार, अशी चर्चा होती. मात्र तसं काहीही झालेलं नाही. हार्दिक पंड्या हाच पुढील हंगामात मुंबईचा कर्णधार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या मोसमातही रोहित एक खेळाडू म्हणूनच खेळणार आहे.
कुणाला किती रक्कम?
मुंबईने जसप्रीत बुमराहला सर्वाधिक 18 कोटी रुपये देत रिटेन केलं आहे. तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांना सारखीच रक्कम मिळाली आहे. दोघांना प्रत्येकी 16 कोटी 35 लाख रुपये मिळणार आहे. रोहितला 16 कोटी 30 लाख रुपये देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. तर तिलक वर्मा याला 8 कोटींवरच समाधान मानावं लागणार आहे.