SRH vs MI : IPL 2025 मध्ये इंडिया-ऑस्ट्रेलिया सामना, रोहित-पॅट आमनेसामने
SRH vs MI IPL 2025 : क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज बुधवारी 23 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यानिमित्ताने भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पाहायला मिळणार आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेतील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईचं तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा सामना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा असणार आहे. तसेच या सामन्यात पॅट कमिन्स आणि रोहित शर्मा या दोघांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या संघांचं रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स हे दोघे नेतृत्व करतात. त्यामुळे हैदराबाद विरुद्ध मुंबई या सामन्याकडे भारत-ऑस्ट्रेलिया मॅच प्रमाणे पाहिलं जात आहे.
हैदराबादचा हा या मोसमातील मुंबई इंडियन्स विरुद्धचा एकूण आणि सलग दुसरा सामना आहे. मुंबईने हैदराबादला 17 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये 4 विकेट्सने लोळवलं होतं. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हैदराबादला पराभवाची धुळ चारण्यासाठी सज्ज झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादकडे घरच्या मैदानात गेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. आता मुंबई साखळी फेरीत दुसऱ्यांदा यशस्वी होते की हैदराबाद परतफेड करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हैदराबादची वाईट स्थिती
मुंबईचा हा या मोसमातील नववा तर हैदराबादचा आठवा सामना असणार आहे. हैदराबादच्या तुलनेत मुंबई सरस आहे. मुंबईने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. मुंबई 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर हैदराबादला 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. हैदराबादच्या खात्यात फक्त 4 पॉइंट्स आहेत आणि ते शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या स्थानी आहेत.
तसेच मुंबई इंडियन्ससमोर या सामन्यात ट्रेव्हिस हेड याचं आव्हान असणार आहे. याचं हेडने वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये साऱ्या भारताला रडवलं होतं. त्यामुळे हैदराबाद-मुंबई हा सामना इंडिया-ऑस्ट्रेलियापेक्षा कमी नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हैदराबादसाठी करो या मरो स्थिती?
हैदराबादने या मोसमात अप्रतिम सुरुवात केली. मात्र त्यानंतर हैदराबादला आपला दहशत आणि दरारा कायम ठेवता आला नाही. त्यामुळे हैदराबादसाठी आता मुंबई विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे. हैदराबादला प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवायचं असेल तर, इथून पुढे प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हैदराबादसाठी एक पराभवही प्लेऑफचं समीकरण आणखी बिघडवणार ठरु शकतं. त्यामुळे हैदराबाद आता कमबॅक करतं की पराभवाची मालिका अशीच सुरु ठेवते? याकडेही ऑरेंज आर्मीचं लक्ष असणार आहे.
