Jonty Rhodes : जॉन्टी ऱ्होड्सची टीम इंडियात एन्ट्री? नेमकं कशासाठी आणि काय घडतंय?
टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपण्यासाठी अवघ्या 10 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना टीम इंडियात बऱ्याच घडामोडी घडत आहे. प्रशिक्षकपदी कोण बसणार याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, जॉन्टी ऱ्होड्स यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. सुपर 8 फेरीचे सामने सुरु झाले असून लवकरच उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांची नावं पुढे येतील. पण असताना टीम इंडियात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहेत. कारण दहा दिवसानंतर टी20 वर्ल्डकप संपताच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नवी व्यक्ती बसणार आहे. यात गौतम गंभीरचं नाव जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे. असं असताना टीम इंडियात काही महत्त्वाचे बदल केले जाण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाच्या फिल्डिंग कोचपदी जॉन्टी ऱ्होड्स याच्या नावाची चर्चा आहे. दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकापैकी एक आहे. क्रिकेट कारकिर्दीत त्याचं क्षेत्ररक्षण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जॉन्टी ऱ्होड्स आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहे. त्याआधी 9 वर्षे मुंबई इंडियन्सचा भाग होता. इतकंच काय तर 2019 मध्ये भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठीही अर्ज केला होता. मात्र तेव्हा बीसीसीआयने त्याच्याकडे कानाडोळा केला. आता भारताच्या मुख्य प्रशिक्षपदाची निवड अवघ्या काही दिवसात होईल. तत्पूर्वी जॉन्टी ऱ्होड्स याचं नाव क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून समोर आलं आहे.
जॉन्टी ऱ्होड्सने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे त्याचा नावाचा विचार आता होण्याची शक्यता आहे. “मी आणि माझी पत्नी भारतावर प्रेम करतो. या देशाने आम्हाला खूप काही दिलं आहे. टीम इंडियासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.”, असं जॉन्टी ऱ्होड्सने सांगितलं. सध्या भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी टी. दिलीप कार्यरत आहे. राहुल द्रविज यांच्यासोबत त्यांचाही कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे जॉन्टी ऱ्होड्स भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
जॉन्टी ऱ्होड्स दक्षिण अफ्रिकेसाठी 52 कसोटी आणि 245 वनडे सामने खेळला आहे. 52 कसोटी सामन्यात त्याने 2532 धावा केल्या आहेत. तर 245 वनडेत त्याने 5935 धावा केल्या आहेत. जॉन्टी ऱ्होड्सने 52 कसोटी सामन्यात 34 झेल घेतले आहेत. तर 245 वनडे सामन्यात 105 झेल घेतले आहेत. त्यामुळे जॉन्टी ऱ्होड्सच्या या अनुभवाचा टीम इंडियाला फायदा होईल यात शंका नाही. पण आता जॉन्टी ऱ्होड्सची निवड होणार की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
