MUM vs KAR : असं कसं? कर्नाटक 68 धावा कमी करुनही विजयी, सेमी फायनलमध्ये धडक, मुंबईचं पॅकअप
Mumbai vs Karnataka VHT Quarter Final Match Result : कर्नाटकाने पावसाने प्रभावित झालेल्या उपांत्य पूर्व फेरीतल सामन्यात मुंबईवर 55 धावांनी मात करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

क्रिकेटमध्ये विजयी धावांचा पाठलाग करणारा संघ हा विकेट्सने जिंकतो. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणारा संघ सामना धावांनी जिंकतो, हे क्रिकेट चाहत्यांना माहितीय. मात्र विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील बाद फेरीत एका संघाने विजयी धावांचा पाठलाग करताना सामना चक्क धावांनी जिंकलाय. आश्चर्याची बाब म्हणजे विजयी आव्हानापेक्षा 68 धावा कमी करुनही या संघाने सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत धडक दिली. या सामन्यात नक्की काय झालंय? हे सविस्तर जाणून घेऊयात.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2025-2026 मोसमात उपांत्य पूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात मुंबई विरुद्ध कर्नाटक आमनेसामने होते. बंगळुरुतील सीओएमध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई या सामन्यात बंगळुरुच्या गोलंदाजांसमोर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. त्यामुळे कर्नाटकाला तुलनेत सोपं आव्हान मिळालं. मात्र कर्नाटकाला त्यात पावसाची साथ मिळली. पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही. त्याचा फायदा कर्नाटकाला झाला. त्यामुळे सामना जिथे थांबवण्यात आला तिथेच संपला. कर्नाटकाचा विजय झाला. तर मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.
नक्की काय झालं?
कर्नाटकाने मुंबईला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या टॉप ऑर्डरमधील सर्व फलंदाजांनी घोर निराशा केली. निर्णायक सामन्यात सर्वांना सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. ओपनर अंगकृष रघुवंशी 27 आणि इशान मुलचंदानी याने 20 धावा केल्या. मुशीर खान याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मुशीरने 9 धावा केल्या. या मोसमात कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात सिद्धेश लाड याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र सिद्धेश मुंबईसाठी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. सिद्धेशच्या खेळीचा शेवट 38 धावांवर झाला.
हार्दिक तामोरे 1 आणि तनुश कोटीयन याने 6 धावा केल्या. सूर्यांश शेंडगे याने 16 धावांचं योगदान दिलं. तर शम्स मुलानी आणि साईराज पाटील या जोडीने मुंबईची लाज राखली. या दोघांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या खेळीमुळे मुंबईला कर्नाटकासमोर 250 पार मजल मारता आली. शम्सने मुंबईसाठी सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. तर साईराजने नाबाद 33 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 254 धावा करता आल्या.
कर्नाटकाची बॅटिंग आणि पावसाची एन्ट्री
कर्नाटकाने 255 धावांचा पाठलाग करताना कर्णधार मयंक अग्रवाल याच्या रुपात पहिली विकेट गमावली. मयंक कर्नाटकाच्या 44 धावा असताना बाद झाला. मयंकने 12 धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडीक्कल आणि करुण नायर या जोडीने कमाल केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 33 ओव्हरपर्यंत 142 बॉलमध्ये नॉट आऊट 143 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे कर्नाटकाची धावसंख्या ही 1 बाद 187 अशी झाली होती. कर्नाटकाने सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती.
कर्नाटकाला विजयासाठी अवघ्या 68 धावांची गरज होती. तेव्हा सामन्यात पावसाची एन्ट्री झाली. मुंबई विरुद्ध कर्नाटक सामना पावसामुळे प्रभावित राहिला. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. सामना पुन्हा सुरु होण्याची प्रतिक्षा करण्यात आली, मात्र तसं झालं नाही. अशाप्रकारे कर्नाटकाचा व्हीजेडीनुसार (VJD Method) 55 धावांनी विजय झाला. कर्नाटकाने यासह उपांत्य फेरीत धडक दिली. तर मुंबईचं पॅकअप झालं.
