Video : टाळ्या आणि शिट्ट्या, दुखापतीनंतरही देशासाठी जखमी वाघ परतला, पंतचं मैदानात जोरदार स्वागत
भारत आणि इंग्लंड चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. भारतीय संघ 10 खेळाडूंसह मैदानात उतरेल असं वाटत होतं. पण ऋषभ पंतने मोडक्या पायासह मैदानात फलंदाजीसाठी उतरण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि इंग्लंड चौथा कसोटी सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्याच्या निकालावर मालिकेचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे पहिल्या डावात जास्तीत जास्त धावा करून इंग्लंडला बॅकफूटवर ढकलावं लागणार आहे. अशा स्थितीत पहिल्या दिवशी खेळ संपण्यापूर्वी ऋषभ पंतला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडून जावं लागलं. त्याच्या दुखापतीबाबत अनेक अपडेट समोर आले आहेत. त्यात त्याला त्याच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झालं असून सहा आठवडे खेळू शकत नाही, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे चौथ्या कसोटीत भारताला दहा फलंदाजांसह खेळावं लागेल अशी शक्यता होती. मात्र या सर्व शक्यतांवर ऋषभ पंतने त्याच्या शैलीत पाणी सोडलं आहे. भारताची सहावी विकेट शार्दुल ठाकुरच्या रुपाने पडली. त्यामुळे आता तीन विकेट गेल्या की भारताचा डाव आटपण्याची शक्यता होती. पण ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि एकच जल्लोष झाला.
शार्दुल ठाकुरची विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत हळूहळू पायऱ्या उतरत मैदानात आला. त्याला पाहून जमलेल्या गर्दीने एकच जल्लोष केला. लंगडतच त्याने फलंदाजीला सुरुवात केली. फ्रॅक्चर झालेल्या पायासोबतही त्याला त्याच्या संघासाठी लढायचे आहे, त्यामुळे त्याच्या कृतीचं क्रीडाविश्वात कौतुक होत आहे. बीसीसीआयने अपडेट देत सांगितलं की, ‘मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी उजव्या पायाला दुखापत झालेला ऋषभ पंत उर्वरित सामन्यात विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार नाही. ध्रुव जुरेल यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडेल. दुखापत असूनही, ऋषभ पंत दुसऱ्या दिवशी संघात सामील झाला आहे आणि संघाच्या गरजेनुसार फलंदाजीसाठी उपलब्ध असेल.’
Rishabh Pant is hobbling out to a standing ovation from the Old Trafford crowd! 🤯 pic.twitter.com/I1vZ1MLR16
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 24, 2025
ऋषभ पंत फलंदाजीसाठी उतरला नसता तर भारताला 10 फलंदाजांसह खेळावं लागलं असतं. कारण डोकं सोडून इतर कोणत्याही भागाला दुखापत झाली तर रिप्लेसमेंट मिळत नाही. पण पंचांच्या परवानगीने विकेटकीपिंग करू शकतो. अशा स्थितीत भारतावर दहा फलंदाजांसह खेळण्याची वेळ आली होती. मात्र ऋषभ पंत वेदना विसरून मैदानात उतरला आहे. ऋषभ पंत पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट झाला तेव्हा 37 धावांवर खेळत होता. आता त्यापुढे होणारी प्रत्येक धाव भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
