ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये फलंदाजी, व्हिडीओ व्हायरल
रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची निवड झाली असून त्याच्या फलंदाजीकडे लक्ष असेल. कारण या मालिकेनंतरच त्याच्या भविष्याचा विचार केला जाणार आहे. या मालिकेपूर्वी त्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात चांगलाच घाम गाळला.

भारतीय क्रिकेट आता कात टाकताना दिसत आहे. दिग्गज खेळाडूंना त्यांच्या वयाचा विचार करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा विचार करून बीसीसीआयने कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर टाकली आहे. रोहित शर्माची या संघात निवड केली आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेवर रोहित शर्माचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कारण वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळायचं तर चांगली कामगिरी करणं भाग आहे. त्यामुळे रोहित शर्माने आतापासूनच सराव सुरु करण्यास सुरुवात केली आहे. ज्या मातीत रोहित शर्मा घडला. त्या मातीत त्याने क्रिकेटच्या शेवटच्या टप्प्यात सराव करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये रोहित शर्माने चांगलाच घाम गाळला. या मैदानात रोहित शर्माने फलंदाजीचा सराव केला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पार्कात लावलेल्या नेटमध्ये रोहित शर्माने सराव केला. यावेळी रोहित शर्माने बचावात्मक शॉट्सही खेळले आणि आक्रमक फटकेबाजीही केली. रोहित शर्माने एकेरी धाव घेण्यासाठी गॅपमध्येही फटकेबाजी केली. मुंबईच्या या मैदानातील व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मा जवळपात सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहण्याची अनेकांना उत्सुकता आहे. यापूर्वी रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला होता. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
ROHIT SHARMA IS PRACTICING AT SHIVAJI PARK…!!!! 🦁
– He is coming to rule Australia ODI series. pic.twitter.com/MyF6K6vaxd
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2025
टीम इंडियाच्या भविष्याचा विचार करून रोहित शर्माकडील कर्णधारपद आता शुबमन गिलकडे सोपवलं आहे. शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वीरित्या धुरा सांभाळली होती. आता त्याच्याकडून वनडे क्रिकेटमध्ये तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता त्याची कारकीर्द ही वनडे सामन्यांपुरता मर्यादीत आहे. त्याला 2027 पर्यंत फिटनेससोबत फलंदाजीत कमाल करावी लागणार आहे. तर आणि तरच त्याचा वनडे वर्ल्डकपसाठी विचार केला जाईल.
