IPL 2025 स्पर्धेच्या टॉप 2 मध्ये आरसीबी की गुजरात टायटन्स, कसं आहे समीकरण जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेतील टॉप 2 मध्ये पंजाब किंग्सने जागा मिळवली आहे. तर मुंबई इंडियन्स या शर्यतीतून आऊट झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या संघासाठी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस आहे. त्यामुळे या दोन्ही पैकी एका संघाचा फैसला आरसीबी विरुद्ध लखनौ सामन्यानंतर होणार आहे.

IPL 2025 स्पर्धेच्या टॉप 2 मध्ये आरसीबी की गुजरात टायटन्स, कसं आहे समीकरण जाणून घ्या
विराट कोहली आणि शुबमन गिल
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 27, 2025 | 2:51 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना अर्थात 70 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यानंतर टॉप 2 मधील स्थान पक्कं होणार आहे. दुसरीकडे, या सामन्याकडे गुजरात टायटन्सच्या लक्ष ठेवून आहे. कारण जर तरच्या गणितात टॉप 2 ची लॉटरी लागू शकते. त्यामुळे साखळी फेरीतील शेवटचा सामना खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करून टॉप 2 मधील जागा पक्की केली आहे. पण दुसऱ्या जागेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरस आहे. खरं तर ही जागा मिळवणं पूर्णपणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या हाती आहे. तर गुजरात टायटन्सला नशिबावर अवलंबून राहावं लागणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु शेवटचा सामना जिंकला तर…

मुंबईने पंजाब किंग्सविरुद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे आता चौथ्या स्थानावर कायम राहावं लागणार आहे. तर पंजाब किंग्सची टॉप 2 मधील जागा पक्की झाली आहे. दुसरीकडे आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं तर क्वॉलिफाय 1 मध्ये जागा पक्की करेल. आरसीबीचे 19 गुण होतील आणि दुसऱ्या स्थानी विराजमान होईल. असं झालंतर पंजाब किंग्स आणि आरसीबी क्वॉलिफाय 1 मध्ये भिडतील. तर एलिमिनेटर फेरीत मुंबई विरुद्ध गुजरात सामना पाहायला मिळेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु शेवटचा सामना गमावला तर…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा शेवटचा सामना गमावला तर गुजरात टायटन्सला टॉप मध्ये जाण्याची संधी मिळेल. पंजाब किंग्स 19 गुणांसह टॉपला आहे. तर गुजरात 18 गुणांसह टॉप 2 मध्ये असेल. क्वॉलिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, तर एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु लढत पाहायला मिळेल.

टॉप 2 स्थानासाठी इतकी धडपड का?

टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना अंतिम फेरीसाठी प्लेऑफमध्ये दोन संधी मिळतात. समजा आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं आणि टॉप 2 मध्ये धडक मारली, तर पंजाब किंग्स आणि आरसीबी क्वॉलिफायर 1 मध्ये भिडतील. या सामन्यात विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठेल. तर पराभूत झालेला संघ मुंबई आणि गुजरात यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटर फेरीतील विजयी संघाशी भिडेल. म्हणजेच आरसीबी या दोघांपैकी एकाशी क्वॉलिफायर 2 मध्ये भिडेल आणि अंतिम फेरीसाठी लढत देईल. या सामन्यात जिंकलं तर अंतिम फेरी गाठता येईल.