IPL 2026 स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्सची तयारी, संघात होणार सुरेश रैनाची एन्ट्री?
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाची सुमार कामगिरी राहिली. 14 सामन्यापैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळाला. तर 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघात मोठी उलथापालथ होणार याचे संकेत मिळाले आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धा संपण्यासाठी आता अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 3 जून रोजी 18व्या पर्वातील नवा विजेता समोर येणार आहे. प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे चार संघ पोहोचले आहेत. यापैकी एका संघाला जेतेपद मिळणार हे निश्चित आहे. पण 19व्या पर्वापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघात मोठी उलथापालथ होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बदलेल हे जवळजवळ निश्चित आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान चॅनलच्या चर्चेत दिसणारा सुरेश रैना म्हणाला की, सीएसके फ्रँचायझी पुढील हंगामासाठी नवीन फलंदाजी प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी चर्चा करत आहे. सुरेश रैनाने चर्चेत सांगितलं की, सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक असेल.
दरम्यान, पॅनेल चर्चेत असलेल्या आकाश चोप्राने तो प्रशिक्षक कोण आहे असा प्रश्न उपस्थित केला. प्रशिक्षकाच्या नावाचे आद्याक्षर ‘S’ ने सुरू होते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तथापि, सुरेश रैनाने कोणाचेही नाव न घेता सर्वात जलद अर्धशतक झळकावल्याचे संकेत दिले. सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. 2014 मध्ये त्याने पंजाब किंग्जविरुद्ध फक्त 16 चेंडूत अर्धशतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्सकडून आतापर्यंतचे सर्वात जलद अर्धशतक आहे. या हिंटमुळे रैना प्रशिक्षक म्हणून चेन्नई सुपर किंग्स संघात परतणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू माइक हसी 2018 पासून चेन्नई संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. आयपीएल 2026 स्पर्धेत सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक दिसला तर आश्चर्य वाटायला नको. पण आताच त्याबाबत सांगणं कठीण आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स तरुण खेळाडूंसह नवा संघ बांधण्याची योजना आखत आहे. दरम्यान, चेन्नईने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केले . डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी शानदार फलंदाजी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने 231 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सचा संघ 147 धावांवर ऑलआउट झाला. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत तळाशी राहिला आहे.
