श्रेयस अय्यरऐवजी आता या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा, अचानक असा निर्णय घेण्याचं कारण की..
भारत अ संघ ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध दोन सामन्यांची अनऑफिशियल कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र या मालिकेतून श्रेयस अय्यरने अचानक माघार घेतली आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

ऑस्ट्रेलिया ए संघ भारत दौऱ्यावर असून दोन सामन्यांची अनऑफिशियल कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे दुसरा सामना निर्णायक असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. हा सामना 23 सप्टेंबरपासून लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्यातून कर्णधार श्रेयस अय्यरने माघार घेतली आहे. त्यामुळे ऐनवेळी कर्णधार बदलण्याची वेळ संघावर आली आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा झाली तेव्हा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली होती. आता श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यर भारत अ संघातून बाहेर गेला आहे. त्याने आराम करण्यासाठी हा ब्रेक घेतल्याचं बोललं जात आहे. तसेच मुंबईत देखील परतला आहे. त्याने निवडकर्त्यांना या सामन्यासाठी उपलब्ध नसेल अशी माहितीही दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर धुरा सांभाळली होती. हा सामना ड्रॉ झाला होता. या सामन्यातील पहिल्या डावात श्रेयस अय्यरने 8 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात फलंदाजीचा प्रश्नच आला नाही. अय्यरच्या गैरहजेरीत संघाची सूत्र ध्रुव जुरेलकडे सोपवली जातील. कारण या मालिकेत त्याची निवड उपकर्णधार म्हणून केली आहे. जुरेलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. दुसरीकडे, श्रेयसच्या जागी नवा खेळाडू संघात सहभागी केला जाणार नाही.
दरम्यान, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात असतील. मोहम्मद सिराज खलील अहमद जागा घेईल. दुसरीकडे, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे या स्पर्धेतून आऊट होऊ शकतो. या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकला होता. दुसरीकडे, श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दावेदार असणार आहे .ही मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची मालिका आहे.
